ठाणे : ठाणे जिल्ह्यात अनधिकृत बांधकामांना रोखण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांकडे सरकारने नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे. असे अधिकारीच अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकत आहेत. त्यामुळे या बेसुमार पद्धतीने सुरु असलेली अनधिकृत बांधकामे रोखणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे, नवी मुंबईत डाॅ. कैलास गायकवाड आणि मंगळवारी भिवंडी महापालिकेतील अधिकारी सुरेंद्र भोईर असे तीन अधिकारी लाचखोरीच्या सापळ्यात अडकल्याने बेकायदा बांधकामांना अभय देणारी व्यवस्था उघड झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी, मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील काही वरिष्ठ अधिकीरी लाचखोरीमध्ये अडकले आहेत. यामुळे संपूर्ण जिल्हा बेकायदा बांधकामांचा विळखा पडला आहे.

मध्यतंरी ठाणे महाालपालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणात होत असलेल्या बेकायदा बांधकामावर मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांवर जोरदार ताशेरे ओढले होते. जिल्हा सत्र न्यायाधीशाच्या माध्यमातून न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली होती. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली होती. ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनादिवशी महापालिकेमध्येही ही कारवाई झाली होती. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते. पाटोळे यंच्यावर झाली असली तरी अशी अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे म्हटले जाते.

शंकर पाटोळे यांच्या अटकेनंतर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे तत्कालीन उपायुक्त डाॅ. कैलास गायकवाड यांना देखील अटक झाली. महिन्याभरापूर्वी अतिक्रमण विभागासाठी वाहने पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून ४२ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या कारवाईनंतर अतिक्रमण विरोधी विभागाच्या इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले होते. तर भिवंडी महापालिकेत सर्वेअरला अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली. या अधिकाऱ्याला साहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त कार्यभार मिळाला होता. या अधिकाऱ्यांवर अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी होती. पंरतु हे अधिकारी लाचखोरीत अडकत असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाण्यात अनधिकृत बांधकामांवरून केळकर अन् आव्हाड आक्रमक

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली भागात अनधिकृत बांधकामे आणि त्यांना पोसणारी यंत्रणा तयार झाली आहे. विशेषत: भाजप आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विरोधी विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे ठाणे महापालिकेतील कारभार राज्याच्या चव्हाट्यावर आला होता.

२ वर्षांत १५ पालिका अधिकारी गजाआड!

पाटोळे यांच्याप्रमाणेच मागील दोन वर्षांत अनेक महापालिका अधिकाऱ्यांवर विविध प्रकरणांमध्ये कारवाई झाल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, ठाणे आणि मिरा भाईंदर महापालिकेच्या एकूण सहा अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली. तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत भिवंडी, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर आणि ठाणे महापालिकेतील नऊ अधिकारी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

अन्यथा लाचखोरीचे प्रमाण अधिक ठाणे जिल्ह्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते. प्रति चौ. फूटाच्या बदल्यात हे पैसे उकळले जात असल्याचे आरोप अनेकदा झाले. सर्वसामान्य नागरिकांची काही कामे रखडल्यास काही अधिकाऱ्यांकडून क्षुल्लक कारणांसाठी ‘चिरीमिरी’ मागितली जाते, त्याविरोधात नागरिक तक्रार करत नाही. अन्यथा लाचखोरीचे प्रमाण अधिक असू शक ते असे म्हटले जाते.