ठाणे : ठाणे, नवी मुंबईत लाखो ग्राहकांना महावितरणद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. परंतु नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर आता जुने मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्यासंदर्भात संदेश मिळत आहे. ठाणे, नवी मुंबईत स्मार्ट मीटरला मोठ्याप्रमाणात विरोध झाला होता. त्यामुळे आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
ठाणे, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर क्षेत्रात महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा आणि देयक वसूलीची कामे केली जातात. काही वर्षांपूर्वी महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. स्मार्ट मीटर म्हणजे पारंपरिक वीज मीटरऐवजी डिजिटल पद्धतीचे मीटर आहेत. हे मीटर वीज वापराची माहिती आपोआप आणि अचूक पद्धतीने महावितरणकडे पाठवते असा दावा महावितरण कंपनीकडून केला जात होता. पारंपारिक मीटर पद्धतीत कर्मचारी येऊन रीडिंग घेतात किंवा फोटो काढून किती वीज वापरली याची नोंद होते. परंतु स्मार्ट मीटर प्रकारामध्ये मीटर स्वतःच तुमचा वीज वापराचा तपशील कंपनीकडे पाठवित असतो. स्मार्ट मीटर प्रणालीमुळे भविष्यात वीज वितरण क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
वीज चोरीला आळा घालणे, पुरवठ्यातील त्रुटी ओळखणे आणि ग्राहकांना अधिक पारदर्शक सेवा देणे हा या योजनेमागील उद्देश असल्याचे महावितरणचे कर्मचारी सांगतात. परंतु स्मार्टमीटरमुळे नागरिकांना अतिरिक्त विद्युत देयक पाठविले जाईल असा आरोप अनेकांनी केला. स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनेही झाली होती.
आता या स्मार्ट मीटरसाठी नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर स्मार्ट मीटर बसविण्यासाठी संदेश पाठविले जात आहेत. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईत पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.
