ठाणे : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी सोडण्यात आलेल्या मोफत एसटी बसगाड्या आणि गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे शुक्रवारी रात्री ठाणे आणि नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही प्रवाशांचे हाल झाले. टीएमटीच्या बसगाड्या तसेच रिक्षा सहज उपलब्ध होत नसल्याने स्थानकातील सॅटीस पुलावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. बसगाड्यांसाठी प्रवाशांना तब्बल २० ते २५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
ठाणे जिल्ह्यात कोकणपट्ट्यातील नागरिक मोठ्याप्रमाणात वास्तव्य करतात. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समूह पद्धतीने एसटीची नोंदणी केली आहे. या एसटी बसगाड्या शुक्रवारी कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. तसेच, अनेकजण त्यांच्या खासगी वाहनाने देखील रायगड, रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर बसला. ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा-महापे मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, खारघर भागात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागला.
ठाणे ते वाशी हे अर्धा ते पाऊण तासाचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना किमान दोन तास लागले. दरम्यान, ठाणे बाजारपेठेतही गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी होऊन टीएमटीच्या बसगाड्याही त्यात अडकल्या. त्याचा परिणाम ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर झाला. बसगाड्यांसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच रिक्षाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.
