ठाणे : नवी मुंबई शहरात झालेले नागरिकरण आणि व्यवसायिक कंपन्या वाढण्यासह येथे ठाणे ते वाशी आणि पनवेल अशी रेल्वे वाहतुक सुरु झाली. नवी मुंबईतील स्थानके सिडकोच्या माध्यमातून निर्मित करण्यात आले. पूर्वी ट्रान्स हार्बर मार्गावर कधीही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत नसे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तांत्रिक बिघाडासह विविध कारणांमुळे येथील त्रास देखील वाढू लागले आहे. त्यामुळे आता ट्रान्स हार्बरची प्रवासी क्षमता आता आवाक्याबाहेर गेली आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे.
ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई या शहरात ऐरोली, रबाळे, सानपाडा, तुर्भे, वाशी, पनवेल या भागात नागरिकरण वाढले आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये देखील स्थापन झाली. मुंबई आणि ठाणे शहरापासून नवी मुंबई जवळचे शहर असल्याने येथे नव्याने राहण्याचे येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. ट्रान्स हार्बर मार्गिका सुरु झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करत कर्जत, कसारा, कल्याण भागातील नोकरदार या भागात नोकरी निमित्ताने जाऊ लागला.
पूर्वी ट्रान्स हार्बर मार्गावर बिघाड झाल्यास त्याचा परिणाम इतका होत नव्हता. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांचा भार वाढण्यासोबतच येथील बिघाडाच्या समस्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. येथून वाहतुक करणाऱ्या प्रवाशांना सकाळ आणि रात्रीच्या वेळेत गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच सुमारे साडे चार तास येथील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे येथील नोकरदारांना रस्ते मार्गाचा वापर करावा लागला होता. ही घटना महिना भरापूर्वीच झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्याचा परिणाम जाणवला. नेरुळ येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे आता ट्रान्स हार्बरचे रडगाणे सुरु झाल्याचे चित्र आहे. येथील प्रवासी क्षमता आवाक्या बाहेर गेली आहे का, हा प्रश्न आहे.