लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे – नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाण्यात मंडप उभारणीसाठी मंडळांची धावपळ सुरू झाली आहे. महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल २३७ अर्ज दाखल झाले असताना केवळ ८० मंडळांनाच मंडप उभारणीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित मंडळांना परवानगी कधी मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
नवरात्रोत्सवात शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर मंडप उभारले जातात. देवीची आरास, विद्युत रोषणाई, गरबा-दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, पादचारी मार्ग अडविले जाऊ नयेत आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी महापालिकेकडून अर्जांची छाननी करून परवानगी दिली जाते.
लोकमान्यनगर-सावरकरनगर आघाडीवर
प्रभाग समितीनिहाय विचार करता लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीकडे सर्वाधिक ४५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २२ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर कळवा येथे २९, वर्तकनगरमध्ये २२, वागळे परिसरात १९, उथळसरमध्ये १९ आणि नौपाडा-कोपरी (नौपाडा विभाग) येथे १८ अर्ज दाखल झाले आहेत. मुंब्रा परिसरातून सहा अर्ज प्राप्त झाले आहेत. दिवा परिसरातही मंडळांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज करण्यात आले आहेत.
१५७ अर्ज निर्णयाच्या प्रतीक्षेत
महापालिकेकडे प्राप्त झालेल्या २३७ अर्जांपैकी ८० अर्ज ऑनलाइन, तर १५७ अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत. आतापर्यंत ८० मंडळांना परवानगी मिळाली असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. मंडपाची जागा, वाहतुकीवरील परिणाम, अग्निसुरक्षा, सुरक्षित विद्युत जोडणी आणि आपत्कालीन मार्ग यासह विविध बाबी तपासल्यानंतर परवानगी दिली जात आहे.नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने उर्वरित अर्जांवरही लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा मंडळांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, परवानगी न घेता मंडप उभारणाऱ्या मंडळांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याने मंडळांनी महापालिकेची परवानगी घेऊनच मंडप उभारावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंडप परवानगीची स्थिती
एकूण अर्ज : २३७
ऑनलाइन अर्ज : ८०
ऑफलाइन अर्ज : १५७
परवानगी मिळालेली मंडळे : ८०
निर्णयाच्या प्रतीक्षेत : १५७ अर्ज
