ठाणे : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात सोमवारी ठाण्यात राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसने ज्ञानेश यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली, तर काँग्रेसने त्यांच्या नावाने प्रतीकात्मक उठाबशा काढून निषेध नोंदवला. मतदार याद्या, एसआयआर व नवमतदार नोंदणीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर १४ वेळा लेखी आक्षेप घेतल्याचे वृत्त २३ सप्टेंबरला प्रसिद्ध झाले.

फॉर्म ६ मधील बदल, एसआयआर प्रक्रिया, मतदारांची नावे समाविष्ट करणे वा वगळणे तसेच मतदार यादीच्या तांत्रिक व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर हे आक्षेप असल्याचा त्यांच्या आरोप आहे. त्याचे पडसाद देशभरात उमटत असतानाच सोमवारी ठाण्यात राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने सोमवारी पाचपखाडी येथील पक्ष कार्यालयापासून ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ज्ञानेश कुमार यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला गाढवावर बसवून प्रतीकात्मक धिंड काढण्यात आली. गाढवाच्या गळ्यात ‘एक तडीपार चंद्रावर… ज्ञानेशकुमार गाढवावर’ असा फलक लावण्यात आला होता. तर सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तींना घोड्यावर बसवण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश कुमारांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला जोडे मारण्यात आले. तसेच ‘ज्ञानेश हटाव, निवडणूक आयोग बचाव’, ‘ज्ञानेश कुमारला अटक करा’, ‘लोकशाहीची हत्या थांबवा’, ‘एसआयआर हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. मतदार याद्यांमधील कथित फेरफार, मतदारांची नावे वगळणे व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराचा निषेध केला. आंदोलनात त्यांच्या नावाने प्रतीकात्मक उठाबशा काढण्यात आल्या. तसेच त्यांच्या राजीनाम्यासह बडतर्फी व कारवाईची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा व प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनाला माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मतदारांची नावे हेतुपुरस्सर वगळल्याचा आरोप करीत ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई, बडतर्फी तसेच अटकेची मागणी करण्यात आली.