ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससीच्या) वतीने ठाण्यात पार पडणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी (NDA & NA Exam II) तसेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेच्या (CDS Exam II) पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी केंद्रांच्या परिसरात कठोर निर्बंध लागू केले आहेत. शहरातील एकूण नऊ केंद्रांवर १३ सप्टेंबर रोजी या परीक्षा घेतल्या जातील. यासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. त्यात जमावबंदीसह केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बूथ, स्टेशनरी दुकाने सर्व बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वागळे इस्टेट हद्दीतील एकूण ९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. केंद्रांच्या परिसरात गैरप्रकारांना आळा घालणे, परीक्षार्थींना मदत करण्याच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखणे तसेच परीक्षेच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हे निर्बंध लागू असतील.

परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी व पोलिस अधिकारी वगळता इतर व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या लगतच्या परिसरात अनधिकृतपणे प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आदेशाची माहिती संबंधित परीक्षा केंद्रे, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करून नागरिकांना त्याची माहिती देण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत.