ठाणे : राज्यात पाणी टंचाईसदृश स्थिती असताना ठाण्यात नव्या इमारतींना आता पाणी जोडणी देणे कठीण होत असल्याची कबुलीच महापालिकेच्या शहर अभियंता विभागाने दिली आहे. नव्या इमारतींना बांधकाम परवानगी वा भोगवटा प्रमाणपत्र देताना काही कठोर अटी टाका व टंचाईच्या कठोर वास्तवाची जाणीव करून द्या, अशी थेट भूमिका या विभागाने घेतली आहे. शहर अभियंता विभागाच्या या निर्णयाचे ठाण्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने मात्र स्वागत केले आहे. घोडबंदर मार्गावरील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसताना नव्या इमारतींना पाणी देणे किती योग्य, असा सवाल आम्ही गेली सहा वर्षे विचारत आहोत.
असे असताना महापालिका प्रशासन या आघाडीवर काही कठोर पावले उचलणार असेल तर त्याचे स्वागतच, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व या भागातील नेते मनोहर डुंबरे यांनी भूमिका मांडली आहे. सत्ताधारी शिवसेनेने मात्र अधिकाऱ्यांच्या या निर्णयाबाबत सावध भूमिका घेतली आहे.
ठाणे शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा संबंधी तक्रारी आहेत. शहरातील चोहोबाजूंनी मोठया संख्येने नव्या इमारतींची उभारणी सुरू आहे. नव्या विकास नियंत्रण, प्रोत्साहन नियमावलीमुळे चटई क्षेत्र निर्देशाकांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारतींची उभारणी ठाण्यात मोठ्या संख्येने सुरू आहे. नव्या संकुलांची उभारणी व वाढणारी लोकसंख्या, त्या प्रमाणात ठाण्यात पाणीपुरवठ्याचे काय, या प्रश्नाची उकल मात्र झालेली नाही.
यंदाच्या वर्षात मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच प्रमुख शहरांना पाणी टंचाई, कपातीचा सामना करावा लागेल असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील नव्या बांधकामांना परवानगी देताना पाणी वापरासंबंधी कठोर नियमांची जाणीव करून दिली जावी, अशी स्पष्ट भूमिका महापालिकेच्या शहर अभियंता विभागाने घेतली आहे.
घोडबंदरच्या रहिवाशांना आधी पाणी द्या
घोडबंदर रोडवरील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नव्या इमारतींना पाणी जोडण्या देण्यासाठी सहा वर्षांपासून तीव्र विरोध केला जात होता. नव्या इमारतींना पाणी देऊ नये, या शहर अभियंता विभागाच्या निर्णयाचे भाजपचे घोडबंदर मार्गावरील वसाहतींतील नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी स्वागत केले आहे. घोडबंदर रोडवरील थेट गायमुख-भाईंदरपाड्यात रहिवाशी संकुले उभारणी सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे जुन्या रहिवाशांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले होते. या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. मे २०१७ मध्ये झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने घोडबंदर रोडवरील बांधकामास आरंभ व भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी स्थगिती दिली होती.
त्यावेळी महापालिकेने प्रतिज्ञापत्रात २०१२ ते २०१७ दरम्यान २०६ प्रकल्पांना १४७८ पाणीजोडण्या दिल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. तसेच या भागात पाणीटंचाई नसून, वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचा फटका त्यावेळी २८५ इमारतींना बसला होता. कालांतराने ऑक्टोबर २०१७ मध्ये स्थगिती उठविण्यात आली होती. दहा ते १२ वर्षांपासून घोडबंदर रोड परिसरातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या भागातील रहिवाशांनी ऐन पावसाळ्याच्या काळातही पाणीटंचाई अनुभवली. करोना संसर्ग सुरू असताना सप्टेंबर २०२० मध्ये नव्या बांधकामांना पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याची महापालिकेकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे टँकर लॉबी फोफावून नागरिकांना पाणी विकत घेण्यासाठी भुर्दंड सोसावा लागत आहे, असा आरोप डुंबरे यांनी केला आहे.
वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्याचा महापालिकेचा दावा आहे. मात्र, ते नियोजन प्रत्यक्षात साकारले नाही. विशेषत: नव्या इमारतीत राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचीही पाणी नसल्यामुळे फसवणूक होत होती. इमारतीतील रहिवाशांना घरांचा ताबा देऊन विकासक निघून जातात. त्यानंतर रहिवाशांचे हाल होतात. त्यावेळी संबंधित सोसायटीतील नागरिक नगरसेवकांकडे धाव घेतात. या पाणीटंचाईचे विनाकारण खापर नगरसेवकांवर फोडले जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीबंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेची कोंडी?
अतिरीक्त पाण्याचा पुरवठा उपलब्ध होत नाही तोवर ठाण्यातील नव्या इमारतींना पाणी जोडणी देऊ नये, या शहर अभियंता विभागाच्या भूमिका भाजपने पाठिंबा दिला असताना सत्ताधारी शिवसेनेने मात्र याविषयी अजून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. अशा स्वरूपाचा निर्णय घेणे राजकीयदृष्ट्या किती योग्य ठरेल, याविषयी सत्ताधाऱ्यांच्या गोटात स्पष्टता नसल्याची चर्चा आहे. पालिकेकडे पाण्याचा स्वतंत्र स्रोत नाही. बारवी व स्टेम प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या पाण्यावर शहराची गुजरण चालते. या पार्श्वभूमीवर भाजपने या निर्णयाचे स्वागत करीत सत्ताधारी शिवसेनेला एकप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
