महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून त्यात मुंब्र्यातील एक प्रभाग कमी करून दिवा भागात प्रभागांची संख्या वाढविण्यात आली आहे. दिव्यात प्रभाग संख्येत वाढ व्हावी यासाठी शिवसेना तर, मुंब्र्यात प्रभाग संख्येत वाढ व्हावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती. असे असतानाच अंतिम रचनेत दिव्यात नगरसेवकांची संख्या सात ऐवजी नऊ तर मुंब्र्यात नगरसेवकांची संख्या २७ वरून २५ करण्यात आली आहे. यामुळे अंतिम प्रभाग रचनेत राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

ठाणे महापालिकेत सद्यस्थितीत नगरसेवकांची संख्या १३१ इतकी आहे. अगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या संख्येत ११ ने वाढ करण्यात आली असून यामुळे नगरसेवक संख्या १४२ इतकी झाली आहे. ही निवडणुक तीन सदस्य पद्धतीने होणार असल्याने प्रभागांची संख्या ४७ इतकी आहे. यातील एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. तर उर्वरित प्रभाग तीन सदस्यांचे असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती. त्यात दिव्यातील नगरसेवक संख्या कमी करून मुंब्र्यात नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आली होती. दिव्यात यापूर्वी आठ नगरसेवक होते. प्रारूप रचनेत नगरसेवक संख्या सात झाली होती. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाची लढाई रंगली होती. या प्रभाग रचनेविरोधात शिवसेनेने हरकती नोंदविल्या होत्या. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून त्यात मुंब्र्यातील एक प्रभाग कमी करून दिवा भागात प्रभागांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे अंतिम प्रभाग रचनेत राष्ट्रवादीला धक्का बसल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत पालिका निवडणुक विभागाला प्राप्त १ हजार ९६४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यात चार सदस्यांचा प्रभाग असलेल्या साबे, दिवा या प्रभागातून सर्वाधिक म्हणजेच ३३५ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर महापालिकेने सुनावणी घेऊन प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. ही रचना राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली असून त्यात केवळ दिवा आणि मुंब्रा भागातील प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे. उर्वरित प्रभागात थोडेफार बदल करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.