ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाणपूलाजवळ सोमवारी भीषण अपघातात सहा वाहनांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात शेख शाबीर महमूद (२२) या टेम्पो चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये चार कार आणि दोन टेम्पोचा सामावेश असून वाहनांचे नुकसान झाले आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर सोमवारी दुपारी १.४७ वाजता हा अपघात झाला. नितीन कंपनी उड्डाणपूलावरून दोन टेम्पो आणि चार कार मुंबईच्या दिशेने वाहतुक करत होते. त्याचवेळी या वाहनांची अचानक एकमेकांना धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक शेख शाबीर मोहम्मद हा जखमी झाला. त्याच्या डाव्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती कोपरी वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील आणि वागळे वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांना मिळाल्यानंतर

वाहतुक पोलीस अधिकारी, नौपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेख हे टेम्पोमध्ये जखमी अवस्थेत अडकले होते. पथकांनी त्यांना सुरक्षित टेम्पो बाहेर काढले. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.