ठाणे : वागळे इस्टेट येथील एका कंपनीतून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या त्रासामुळे अभ्यास होत नसल्याने तसेच प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा आरोप करत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने कंपनीच्या मालकाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे कंपनी मालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २८ परिसरात ३२ वर्षीय मुलगा राहत आहे. तो सध्या केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. त्याच्या घराशेजारी कंपनी असून त्यामधील यंत्रांमुळे आवाज येत असतो. तरुणाने श्रीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, या आवाजामुळे त्याचे घर कंपीत होते. तसेच तो राहत असलेला भाग औद्योगिक नसून ते रहिवासी क्षेत्र आहे. याबाबत कंपनी मालकाकडे तक्रार करुनही कंपनीतील यंत्रणा सुरुच होत्या असे तक्रारीत म्हटले आहे.
२०२१ पासून हा यंत्रांचा आवाज येत असल्याने कानाला त्रास झाला असून त्याचे वैद्यकीय अहवाल असल्याचे तरुणाने म्हटले आहे. आवाजामुळे अभ्यासावर आणि प्रकृतीवरही दुष्परिणाम झाल्याचा आरोप त्याने केला. या तक्रारीच्या आधारे, संबंधित कंपनी मालकाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.