ठाणे : महापलिका क्षेत्रात ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतरही कामे रखडल्याने आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ५ जूनची नवी मुदत जाहीर केली आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील अनेक नाल्यांच्या काठावर गाळाचे ढीग अजूनही पडून असल्याचे चित्र असून या नव्या मुदतीत तरी कामे पूर्ण होणार का असा प्रश्न यनिमित्ताने उपस्थित होत आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. नाल्यातून काढलेला गाळ तातडीने उचलून योग्य ठिकाणी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये गाळाचे ढीग अजूनही नाल्यांच्या काठावर पडून असल्याचे चित्र असून ३१ मेच्या मुदतीसाठी तीन दिवस शिल्लक राहिली असतानाही नालेसफाई कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. नाले सफाई कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत ही बाब उघड होताच, त्यांनी नालेसफाईसाठी ५ जूनची नवी मुदत दिली. तसेच नालेसफाईची कामे करताना दर्जा, गती आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांचा प्रभागसमितीनिहाय आढावा घेताना आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. नालेसफाईची उर्वरित कामे ५ जूनपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे आदेशही बैठकीत दिले. ज्या परिसरात नालेसफाईची कामे सुरू आहेत, किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा, त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील, त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.
तसेच ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहेत, जेथे दरवर्षी पाणी साचते, अशा ठिकाणी जवळपास १०२ पंप बसविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचल्यास त्या ठिकाणी पंप ऑपरेटरची व्यवस्था करणे तसेच पंप बंद पडल्यास तात्काळ कार्यवाही होईल याबाबत नियोजन करावे, शहरातील संवेदनशील आणि पूरप्रवण ठिकाणी विशेष लक्ष ठेवून उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील अनेक नाल्यांच्या काठावर गाळाचे ढीग अजूनही पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नालेसफाईदरम्यान काढण्यात येणारा गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच रेल्वे हद्दीलगत असलेल्या कल्व्हर्ट, नाले, खाडीमुख प्रवाह मार्ग पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
नालेसफाईची कामांचा दैनंदिन आढावा घेवून केलेल्या कामाचा तपशील ठेवावा, आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावून ५ जूनपर्यत समाधानकारक काम झाले पाहिजे असे निर्देश त्यांनी सर्व संबंधितांना बैठकीत दिले. या बैठकीस उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सर्व प्रभागसमितीचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
ठाणे शहरातील १८६ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचे नियोजन होते. यंदा नालेसफाईसाठी सात ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून मेअखेरपर्यंत नालेसफाईची मुदत होती. शक्य त्या ठिकाणी रोबोटिक यंत्राद्वारे नालेसफाई केली जात असून अरुंद नाल्यांमध्ये मनुष्यबळाचा वापर केला जात आहे.
नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने योग्य ठिकाणी हलविण्यावर भर देण्यात येईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. तसेच कामगारांना गमबूट, हातमोजे, मुखपट्टी आदी सुरक्षासाहित्य देण्याबरोबरच प्रथमोपचार सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही कंत्राटदारांना देण्यात आल्या होत्या. मात्र, दरवर्षीप्रमाणेही जूनपर्यंत नालेसफाईची कामे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
