ठाणे : ठाण्यात अनेक नाल्यांच्या काठावर गाळाचे ढीग कायम असल्याचे चित्र आहे. ५ जूनची मुदत उलटूनही नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्याचा आरोप होत असून, पाऊस झाल्यास काठावरील गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाऊन पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ तातडीने उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, ठरवून दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण कामे पुर्ण झाली नाही. यामुळे ५ जूनची नवी मुदत देण्यात आली. परंतु या मुदतीनंतर नाल्यांची सफाई सुरू असून काही ठिकाणी नाल्यांच्या काठावर सात ते आठ दिवसांपासून गाळ पडून आहे. यामुळे नालेसफाईचा मुद्दा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा चर्चेत आला.

नालेसफाईच्या कामांचा आढावा घेताना कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त राव यांनी ५ जूनची नवी मुदत जाहीर केली. तसेच उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कामाचा दर्जा, गती आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. नालेसफाईच्या कामांचा दैनंदिन आढावा घेऊन समाधानकारक काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील अनेक नाल्यांच्या काठावर गाळाचे ढीग अद्यापही पडून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यास हा गाळ पुन्हा नाल्यांमध्ये वाहून जाऊन पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.