ठाणे : शहरातील पाचपाखाडी भागात रस्त्यांमधील विद्यूत तारांमध्ये बिघाड झाल्यामुळे सुमारे ११ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. तर, घोडबंदर भागातील आनंद नगर परिसरात देखील वीज पुरवठा खंडित झाला होता. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

ठाण्यातील पाचपाखाडी भागात गृहसंकुलांसह अनेक मोठमोठी दुकान तसेच हॉटेल्स आहेत. शेकडोच्या संख्येने रहिवाशी या भागात राहतात. पाचपाखाडी परिसरात शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास रस्त्यांमधील विद्यूत तारांमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक वीज पुरवठा खंडित झाला. या भागातील रहिवाशांनी महावितरण विभागाला याबाबत संपर्क साधला असता त्यांनी किरकोळ बिघाड झाल्याचे सांगितले. त्यामुळे वीज पुरवठा काही वेळातच सुरु होईल असा समज नागरिकांमध्ये झाला.

प्रत्यक्षात बिघाड शोधण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेची परवानगी घेऊन रस्ता खोदून तो बिघाड दुरुस्त करायचा होता. परंतू, ठाणे महापालिकेतील कारभार सकाळी १० नंतर सुरु होत असल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना बिघाड दुरुस्त करण्यास विलंब लागला.

दुपारी उशिरा या भागातील विद्यूत वाहिन्यांचे काम सुरु आहे. त्यामुळे दुपारी तीन वाजून गेले तरी महावितरण कर्मचाऱ्यांना बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळित करण्यात यश आले नाही. पहाटे पाच वाजता खंडीत झालेला वीज पुरवठा ११ तास उलटून गेले तरी सुरु झाला नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

घोडबंदर भागातील आनंद नगर परिसरातही विद्यूत पुरवठा खंडित

घोडबंदर भागातील आनंद नगर परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून विद्यूत पुरवठा खंडीत झाला. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतू, दुपारी तीन वाजून गेले तरी हा विद्यूत पुरवठा सुरळित झाला नव्हता.