ठाणे : पाचपाखाडीतील गुरुकुल सोसायटीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाविरोधात अखेर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. विकासकाला अटक झाल्यानंतर रहिवाशांचे थकीत भाडेही धनादेशाद्वारे अदा करण्यात आले असून विकासकाने ना हरकत पत्र दिल्याने गुरुकुल सोसायटीच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे संकुलाच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे येथील पाचपाखाडी भागात गुरुकुल सोसायटी आहे. या सोसायटीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. एका विकासकाला सोसायटीने हे काम दिले होते. परंतु सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम रखडल्यामुळे रहिवाशी अडचणीत आले होते. या संदर्भात रहिवाशांनी विद्याधर वैशंपायन, ॲड. अल्केश कदम, विलास साठे यांच्या माध्यमातून राहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. त्यानंतर केळकर यांनी याबाबत पाठपुरावा करत प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न केले.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित १२५ व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासाबाबत माहिती दिली. या गृहसंकुलाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतलेल्या विकासकाने रहिवाशांची भाडी थकवलीच, शिवाय प्रकल्प पूर्ण करण्यातही अपयशी ठरला. रहिवाशांनी विद्याधर वैशंपायन, ॲड. अल्केश कदम, विलास साठे यांच्या माध्यमातून राहिवाशांनी माझी भेट घेतली. याबाबत पाठपुरावा करत प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न केले. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. रहिवाशांना त्यांची प्रलंबित भाडी देखील धनादेशाद्वारे अदा करण्यात आली असून विकासकाने नाहरकत पत्र देखील दिले आहे. त्यामुळे गृहसंकुलाच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली.
पाणी टंचाई तक्रारी
धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला असला तरी ठाणे शहरात पाणीटंचाई अद्याप भेडसावत आहे. मानपाडा येथील हिलक्रिस्ट सोसायटी, एम.जी. रेसिडेंसी, पातलीपाडा हिरानंदानी परिसर, ऋतू इस्टेट, क्लासिक कॉसमॉस, यशस्वीनगर म्हाडा सोसायटी, मरीआई नगर ढोकाळी, वसंत विहार, रजनीश हवामहल, सोसायटी, पिनॅकल सोसायटी या परिसरातील रहिवाशांनी पाणी टंचाईच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात केल्या आहेत. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. याबाबत बोलताना केळकर यांनी सांगितले, शहराला ६० एमएलडी पाण्याची कमतरता असताना ८०हून अधिक गगनचुंबी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. भविष्यात येथील रहिवाशांना पाणी कसे मिळणार,
मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर ठाण्याला पाच एमएलडी अतिरीक्त पाणी मिळाले असले तरी ते पुरेसे नाही. त्यामुळे जोपर्यंत पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, याचा पुनरुच्चार केळकर यांनी केला. पालकमंत्र्यांनी पाणी टंचाईबाबत लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घ्यावीत, अधिकाऱ्यांकडून पाण्याचे नियोजन करून घ्यावे , असेही ते म्हणाले.
