ठाणे : यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात झालेल्या अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका ठाणे जिल्ह्यातील भात शेतीला बसला आहे. जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या आणि रोपवाटिका तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर उशिराने सुरू झाले. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवडीच्या कामांना वेग दिला असला, तरी अद्याप जिल्ह्यात भाताची शंभर टक्के लागवड पूर्ण झालेली नाही. सध्या जिल्ह्यात सुमारे ५० टक्के लागवड पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रामध्ये लागवडीची कामे सुरू आहेत. त्यामुळे यंदा भात काढणीचा हंगाम नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये न होता नोव्हेंबर महिन्यात जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण तसेच इतर आदिवासी व डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भाताचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मान्सून वेळेत आणि पुरेशा प्रमाणात सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली नाही. काही भागांत तुरळक सरी कोसळल्या, परंतु त्या पेरणीसाठी पुरेशा ठरल्या नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली.

काहींनी प्रारंभी पेरणी केली असली तरी पुरेशा पाण्याअभावी ती अपेक्षित गतीने वाढू शकली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा रोपवाटिका तयार करण्याची वेळ आली. जूनमधील या पावसाच्या खंडामुळे संपूर्ण शेतीचे वेळापत्रक जवळपास तीन ते चार आठवडे मागे पडले. जुलै महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले. जिल्ह्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी युद्धपातळीवर लागवडीची कामे सुरू केली. शेतामध्ये पाणी साचल्यानंतर रोपांची पुनर्लागवड वेगाने सुरू झाली. त्यामुळे आता रोपवाटिकांचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात भाताच्या रोपवाटिका शंभर टक्के तयार झाल्या आहेत. मात्र रोपवाटिका पूर्ण झाल्या म्हणजे लागवड पूर्ण झाली असे नाही.

अनेक भागांत अजूनही रोपे शेतात लावण्याचे काम सुरू असून प्रत्यक्ष लागवड केवळ ५० टक्क्यांच्या आसपास झाली आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकरी, कुटुंबातील सदस्य आणि मजूर दिवसभर शेतामध्ये उतरून लागवडीची कामे करत आहेत. सलग पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी कामांना गती मिळत असली, तरी काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतात पाणी जास्त साचल्याने लागवडीत अडथळेही निर्माण होत आहेत. त्यामुळे उर्वरित लागवड पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उशिरा लागवडीमुळे भात पिकाची काढणी लांबणार

भात पिकाच्या वाढीचे संपूर्ण चक्र हे लागवडीच्या तारखेवर अवलंबून असते. साधारणपणे जून महिन्यात पेरणी व जुलैच्या सुरुवातीपर्यंत लागवड पूर्ण झाल्यास ऑक्टोबरमध्ये भात काढणीला सुरुवात होते. मात्र यंदा लागवडच उशिराने होत असल्याने पिकाला परिपक्व होण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागणार आहे. परिणामी यंदाचा काढणीचा हंगाम ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये जाण्याची शक्यता आहे.याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही.

भाताची काढणी उशिराने झाल्यास मळणी, धान खरेदी, गिरण्यांमधील प्रक्रिया तसेच बाजारात नवीन तांदळाची आवकही नेहमीपेक्षा उशिराने होईल. त्यामुळे संपूर्ण कृषी साखळीचे वेळापत्रक महिनाभर पुढे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुलैअखेरपर्यंत पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पावसाची साथ कायम राहिल्यास उर्वरित लागवड वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या विलंबाचा परिणाम यंदाच्या संपूर्ण खरीप हंगामावर स्पष्टपणे दिसून येत असून, भात उत्पादनाच्या वेळापत्रकावर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचे चित्र सध्या ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.