ठाणे – ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांचे ”सहकार पॅनल” विरुद्ध भाजप प्रणित ”परिवर्तन पॅनल” असा सामना रंगला आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ जूनपर्यंत असून या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उमेदवारी मागे घ्या नाहीतर, अनामत रक्कम जप्त होईल, असा सल्ला परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना दिला आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक, बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी सहा दिवसांपुर्वी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे ‘परिवर्तन पॅनल’ तयार करण्यात आल्याची घोषणा केली होती. मात्र, कोणालाही विश्वासात न घेता या पॅनलची घोषणा करण्यात आल्याचा दावा शिंदे सेनेच्या नेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला.

या पत्रकार परिषदेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर, आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या सर्वांनी सहकार पॅनल ची यावेळी घोषणा केली. सहकार पॅनलचे यापूर्वीच ८ उमेदवार संचालक पदी बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित सर्व जागा `सहकार पॅनल” जिंकेल असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला आहे.

सहकार पॅनल स्थापन करण्यापूर्वी सर्वपक्षीय पातळीवर चर्चा सुरू होती. हितेंद्र ठाकूर, किसन कथोरे, सुरेश म्हात्रे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि ठाणे-पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र, या चर्चेदरम्यान काहींनी स्वतंत्र पॅनल जाहीर करून त्यात शिवसेनेचा समावेश असल्याचे दर्शविले, असा दावा शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला.

गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये माझा सहभाग आहे. आजपर्यंत कधीही बँकेमध्ये राजकारण कुठल्याच पक्षाने आणले नव्हते. अचानकच काय झालं काय कळलं नाही, त्याच्या अगोदर एक पॅनल जाहीर झाले. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं, त्याच्यामुळे आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून एकत्र आल्याचे आमदार किसन कथोरे म्हणाले.

विरोधकांना सल्ला

विद्यमान संचालक मंडळाने उत्तमरीत्या बँक चालवली आहे. महाराष्ट्रामध्ये एक नंबर तर भारतामध्ये दोन नंबरची आपली बँक आहे. विरोधी पक्षाने देखील कबुल केले आहे की, विद्यमान संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. १७ जून रोजी माघार घ्यायचा दिवस आहे. विरोधकांनी आपला उमेदवारी मागे घेऊन चांगल्या कामासाठी हातभार लावा, असे आवाहन क्षितिज ठाकूर यांनी केले.

नेमका हाच धागा पकडत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना सल्ला दिला आहे. सहकार पॅनलच्या माध्यमातून आठ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. सत्ता तर शंभर टक्के तर येणारच आहे परंतु सर्वच्या सर्व सहकार पॅनलचे उमेदवार संचालक म्हणून निवडून आणण्यासाठी आमचा भर आहे. उमेदवारी मागे घ्या नाहीतर, अनामत रक्कम जप्त होईल, असा सल्ला त्यांनी दिला आहे.