ठाणे: ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडलेल्या भीषण अपघातांनंतर ग्रामीण भागातील अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी दर अर्धा ते एक तासाच्या अंतराने बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली. जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतुकीबाबत लोकसत्ताने सातत्याने वृत्तांकन देखील केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील रायते पुलाजवळ काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा झालेला हा अपघात संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारा ठरला होता. त्यानंतर पालघर जिल्ह्यात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा अपघात होऊन १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही दुर्घटनांमुळे ग्रामीण भागातील अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.
याच विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार सुनील शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ग्रामीण भागात एसटी बससेवा अपुरी असल्यामुळे अनेक नागरिकांना जीव धोक्यात घालून अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच अशा प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासन या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट केले. ठाणे, पालघर आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून अनेक मार्गांवर बस फेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागांमध्ये सध्या बस दीर्घ अंतराने धावतात, त्या ठिकाणी दर अर्धा ते एक तासाच्या अंतराने बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि अधिकृत सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल आणि अवैध प्रवासी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल.
सरनाईक यांनी सांगितले की, अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांना पर्यायी आणि विश्वासार्ह वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे परिवहन विभाग, एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून एक व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यासोबतच ज्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक अपुरी आहे, त्या भागांमध्ये अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय अपघातप्रवण ठिकाणांची स्वतंत्रपणे ओळख पटविण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. रायते पुलासारख्या दुर्घटनाग्रस्त भागांसह वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणांचा अभ्यास करून तेथे आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्थापन, सूचना फलक, प्रकाश व्यवस्था, संरक्षक कठडे आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात येणार आहेत. या उपाययोजनांमुळे भविष्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागात मालवाहतूक वाहनांमधून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत मांडली. मालवाहतुकीसाठी परवानाधारक असलेल्या वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक होत असल्याचे आढळल्यास संबंधित वाहनांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अशा वाहनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असून अनेक अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे परिवहन विभाग, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा प्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही सरनाईक यांनी यावेळी दिला.
