ठाणे : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकण्याची तयारी सुरू केली असून, या मतदारसंघात सर्वाधिक ४४४ मतांचे संख्याबळ असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला आहे. यासंदर्भात लवकरच पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत मागणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आली.
महायुतीत यापूर्वी ठाणे लोकसभा तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर आता भाजप स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाबाबत आक्रमक आणि आग्रही भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत असून या मुद्द्यावरून महायुतीतील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकूण १८ आमदार आहेत. त्यापैकी भाजपचे नऊ तर, शिंदे सेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर ठाणे लोकसभा आणि शिक्षक मतदार संघावर भाजपने दावा केला होता. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे सेनेला सोडण्यात आली. देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे.
ठाणे तसेच इतर पालिकांमध्ये महायुती सत्तेवर आहे. असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र भाजप आणि शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत वाद आहेत. हे सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसून येत आहेत. अशातच ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणुक जाहिर झाली आहे. या जागेवर शिंदे सेनेचे माजी आमदार रविंद्र फाटक हे यापुर्वी निवडून आले होते. पालिका निवडणुका झाल्या नसल्यामुळे गेली चार वर्षे ही निवडणुक झालीच नव्हती.
ही निवडणूक जाहीर होताच, या जागेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे सर्वाधिक ४४४ मतांचे संख्याबळ आहे तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि निलेश सांबरे गटाकडे मिळून केवळ ३४६ मते आहेत. हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणुक लढले तर, महायुतीच्या उमेदवारासाठी ही निवडणुक सोपी आहे. पण, दोन्ही पक्षांनी मात्र स्वतंत्र निवडणुक लढविली तर, निवडणुक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. असे असतानाच, लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघात माघार घेतल्यानंतर आता भाजपने आता ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा केला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात महायुतीत नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे लोकसभा तसेच शिक्षक मतदारसंघात भाजपची ताकद होती. यातून या दोन्ही मतदार संघात भाजप उमेदवाराने निवडणुक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण, महायुतीत हे दोन्ही मतदार संघ शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आले. आता ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, असा आमचा आग्रह आहे आणि आम्ही वरिष्ठांकडे याबाबत मागणी करणार आहोत. – संजय केळकर, भाजप आमदार
मतांची आकडेवारी
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अंदाजे १०३० मतदार आहेत. या मतदारसंघात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरारसह सात महापालिका, सात नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. भाजपकडे सर्वाधिक ४४४ मतांचे संख्याबळ आहे. दुसरीकडे शिवसेनेकडे ३२६ मते असून नुकतेच त्यांच्या पक्षात प्रवेश केलेले निलेश सांबरे यांच्याकडे २० मते आहेत.
हा आकडा ३४६ इतका होता. बहुजन विकास आघाडीकडे ७१ मते असून हितेंद्र ठाकूर यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसकडे ४७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २९ तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे १८ मते आहेत. याशिवाय मनसे, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रत्येकी ६, एमआयएम ५, कोनार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १, अपक्ष ९ मते आहेत.
