ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जवळपास ७० हून अधिक सदस्यांची मते ताब्यात असूनही ‘ठाणे शिंदेसाठी’ असा न्याय लावत वरिष्ठांनी पुन्हा एकदा ठाणे-पालघर विधान परिषदेची जागा शिवसेनेच्या पदरात टाकल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सुर व्यक्त होऊ लागला आहे. विधान परिषदेचे आमदार म्हणून फारशी प्रभावी कामगिरी नसतानाही शिंदे यांनी पुन्हा एकदा या जागेसाठी माजी आमदार रविंद्र फाटक यांची उमेदवारी जाहीर केली. फाटक यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खरा मात्र भाजपचे जिल्ह्यातील एकमेव मंत्री गणेश नाईक, स्थानिक आमदार संजय केळकर यांनी या प्रक्रियेत सहभागी होणे टाळले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुभेच्छा व्यक्त केल्याचा दावा मात्र शिंदेसेनेकडून केला जात होता.
ठाणे आणि पालघर जिल्हयातील राजकीय परिस्थिती आता पुर्वीसारखी राहीलेली नाही. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्याही भाजपची अधिक आहे. जवळपास एक हजार सदस्यसंख्या असलेल्या या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक ४४४ सदस्य आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि निलेश सांबरे यांची एकत्रित सदस्यसंख्या ३७४ पर्यत भरते. त्यापाठोपाठ बहुजन विकास आगाडीचे ७१ सदस्य आहेत. हे अंक गणित लक्षात घेता ठाणे-पालघरची जागा भाजपचे यंदा पदरात पाडून घ्यावी असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला होता.
मिरा-भाईदर, नवी मुंबई यासारख्या शहरांमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या पक्षात कमालिचा संघर्ष आहे. ठाण्यात निधी मिळत नाही म्हणून भाजपचे नगरसेवक अस्वस्थ आहेत, तर कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत यांच्यापुढे भाजपची डाळ शिजत नाही असे चित्र आहे. नवी मुंबईत वन मंत्री गणेश नाईक शिंदेसेनेच्या नगरसेवकांना सावलीला देखील उभे करत नाहीत. भाईदरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात उभा वाद आहे. या पार्श्वभूमीवर यावेळी ही जागा शिंदे यांना सोडू नये असा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आलेले माजी आमदार रविंद्र फाटक यांची कामगिरी यथातथाच राहीली आहे. मतदारसंघातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी फाटक आक्रमकपणे सभागृहात भांडले आहेत किंवा आग्रही राहीले आहेत असे दृश्यही फारसे पहायला मिळाले नाही. त्यामुळे फाटकांना का मदत करावी असा प्रश्न भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यापुर्वीही उपस्थित केला होता.
शिंदे यांचे फाटक प्रेम कायम
ही जागा शिंदे यांच्या पदरात पडेल हे निश्चित असल्याने या पक्षातून अनेक जण इच्छुक होते. पक्षाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, बदलापूरचे वामन म्हात्रे, शिंदे यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे अशी काही नावे यानिमीत्ताने चर्चेत होती. असे असताना शिंदेनी मात्र पुन्हा एकदा रविंद्र फाटक यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊ केल्याने शिंदे यांच्या पक्षातही दबक्या सुरात नाराजीचा सुर आहे. शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात फाटक यांना मानणारे किमान चार नगरसेवक आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जाणारे फाटक यांना कवेत घेत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील एक परंपरागत विरोधक संपविल्याचे बोलले जात. याच फाटक यांना पुन्हा उमेदवारी देत शिंदे यांनी भाकरी फिरविण्याचे टाळले आहे. फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपकडून माजी खासदार कपील पाटील, आमदार माधवी नाईक उपस्थित होत्या. याशिवाय ठाण्यातील भाजपचे काही नगरसेवकही फाटक यांना भेटले. वन मंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाण्यात येणे टाळले.
