ठाणे : ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीतून शिंदे गटाचे माजी आमदार रविंद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाण्यातील भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेते गैरहजर राहिल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. अखेर मंगळवारी रात्री रविंद्र फाटक यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
ठाणे – पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या जागेसाठी शिंदे गटाकडून रविंद्र फाटक निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान सोमवारी रविंद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महायुती असतानाही भाजपाचे ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे हे अनुपस्थित होते.
त्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या होत्या. या मतदारसंघावर भाजपाने दावा सांगितला होता. ठाणे जिल्ह्यात प्राबल्य असतानाही शिंदे गटाला ही जागा सुटल्याने भाजपमध्ये कुजबुज सुरु होती. तसेच भाजपच्या नेत्यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. मात्र मंगळवारी रात्री उशिरा फाटक यांनी केळकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी केळकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
