ठाणे : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतर्फे ‘परिवर्तन पॅनल’ तयार करण्यात आल्याचा भाजप नेत्यांचा दावा फेटाळून लावत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतंत्र ‘सहकार पॅनल’ ची घोषणा केली. यानिमित्ताने महायुतीत फुट पडल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून यामुळे शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार किसन कथोरे आणि बहुजन विकास आघाडीनेही शिंदे सेनेच्या सहकार पॅनलला साथ दिले असून कथोरे यांच्यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत मतभेदही पुढे आले आहेत.

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक, बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी सहा दिवसांपुर्वी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे ‘परिवर्तन पॅनल’ तयार करण्यात आल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेला बाबाजी पाटील यांच्याशिवाय शिवसेनेचा एकही प्रमुख नेता उपस्थित नव्हता. बाबाजी हे वनमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

त्यामुळे त्यांच्या दाव्यात फारसा दम नसल्याचे बोलले जात होते. असे असतानाच, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक, भाजप आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे आणि बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात म्हस्के यांनी कपील पाटील यांचा दावा फेटाळून लावत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतंत्र ‘सहकार पॅनल’ ची घोषणा केली आणि पॅनलचे उमदेवारही जाहीर केले.

ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात कधीही पक्षीय राजकारणाला स्थान देण्यात आले नाही. आनंद दिघे यांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजही कायम आहे. बँक असो किंवा इतर सहकारी संस्था, शिवसेनेने कधीही पक्षीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला नाही, असे म्हस्के यांनी सांगितले.

सहकार पॅनल स्थापन करण्यापूर्वी सर्वपक्षीय पातळीवर चर्चा सुरू होती. हितेंद्र ठाकूर, किसन कथोरे, सुरेश म्हात्रे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि ठाणे-पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र, या चर्चेदरम्यान काहींनी स्वतंत्र पॅनल जाहीर करून त्यात शिवसेनेचा समावेश असल्याचे दर्शविले.

परंतु त्या पॅनलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचा कोणताही पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे आमदार किसन कथोरे आणि बहुजन विकास आघाडीनेही शिंदे सेनेच्या सहकार पॅनलला साथ दिली असून यानिमित्ताने बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. तसेच निवडणुकीची रंगत वाढली आहे.

ही निवडणूक कुणाविरोधातील नसून चांगल्या विचारांची लढाई आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचावा, हा आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली. बँकेने केलेल्या कामाची दखल राज्य आणि देशपातळीवर घेण्यात आली आहे. शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या या बँकेला अधिक सक्षम करण्यासाठी सहकार पॅनलला पाठिंबा दिला आहे. आधीच्या संचालक मंडळाने चांगले काम केल्याचे समोरच्या पॅनलच्या नेत्यांनी कबुल केले असून त्यांनी १७ तारखेपर्यंत माघार घेऊन निवडणुक बिनविरोध करावी, असे आवाहन क्षितिज ठाकूर यांनी केले.

गेल्या २५ वर्षांत बँकेच्या कामकाजात कधीही पक्षीय राजकारण आले नाही. शेतकरी, ठेवीदार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी बँकेची चांगली परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने सहकार पॅनलची उभारणी करण्यात आली आहे. तसेच पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी याबाबत आपल्याशी संपर्क केलेला नाही, असे किसन कथोरे यांनी स्पष्ट केले. आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिले. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी आणि ठेवीदारांना न्याय मिळावा, बँकेची समृद्धी तसेच भरभराट व्हावी, यासाठी सहकार पॅनलला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

निवडणुक कार्यक्रम

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतिम मतदार यादी १४ मे रोजी प्रसिद्ध झाली असून, २५ मे ते १ जूनदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ जूनपर्यंत आहे. २७ जून रोजी मतदान होऊन २८ जून रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.