विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीतील काही जागांवर उमेदवारी अर्जांवरुन धुसफूस सुरु झाली आहे. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून पर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील, ते माघार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. रविंद्र फाटक यांनी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रविंद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. संबंधित मतदारसंघांमध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीमधील काही ठिकाणच्या बंडखोरीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ तारखेपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ज्यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज भरले असतील, त्यापैकी एकाचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढे जात आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही आमचा विजयाचा झेंडा कायम राहील, असे त्यांनी सांगितले.