ठाणे : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील ठाणे-पालघर मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाने माजी आमदार रविंद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर झाली. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नगरसेवक अभिजीत पवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. अभिजीत पवार हे पूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम पाहायचे.
ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीतून नगरसेवक अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड, भिवंडीचे खासदार बाळ्या मामा, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे उपस्थित होते.
अभिजीत पवार हे कळवा येथील खारेगाव भागात ठाणे महापालिकेतील नगरसेवक आहेत. अभिजीत पवार हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी अचानक अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला होता. परंतु अवघ्या काही तासांत ते पुन्हा एकदा आव्हाड यांच्याकडे आले. अभिजीत हे अनेक वर्षांपासून आव्हाड यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अभिजीत पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आव्हाड यांनी महायुतीमध्ये धुसफूस असून त्याचा फायदा आम्हाला होईल असा दावा केला आहे.
