ठाणे – राज्यात कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, मेंदूविकार आणि वृद्धापकाळाशी संबंधित दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत असताना, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम’ अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे उपचार केवळ रुग्णालयापुरते मर्यादित न राहता, गावपातळीवरील आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे थेट रुग्णांच्या घरी पोहोचणार आहेत. ठाणे जिल्ह्यात या उपक्रमाची अंमलबजावणी प्रशासनाच्या समन्वयातून सुरू झाली असून, ग्रामीण भागातील ८४४ रुग्णांना घरपोच सेवा देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

‘पॅलिएटिव्ह केअर’ म्हणजे नेमके काय?

सामान्यतः ‘पॅलिएटिव्ह केअर’ म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील सेवा असा गैरसमज आढळतो. मात्र, शासनाच्या नव्या आराखड्यानुसार, आजाराचे निदान झाल्यापासून उपचारांच्या संपूर्ण कालावधीत रुग्णाला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आधार देणे हे या सेवेचे मूळ तत्त्व आहे.

यामागील प्रमुख उद्देश म्हणजे वेदना आणि त्रास कमी करणे, रुग्णाचे जीवनमान सुसह्य करणे, कुटुंबियांना मानसिक आधार देणे, सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे, ही सेवा उपचारांचा पर्याय नसून, उपचारांसोबत चालणारी ‘सहाय्यक आणि समग्र’ आरोग्यसेवा आहे.

घरपोच सेवा कशी दिली जाणार आहे?

या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे घरपोच रुग्णसेवा. समुदाय आरोग्य अधिकारी, परिचारिका आणि आशा सेविका यांच्या माध्यमातून रुग्णांची ओळख, नोंदणी आणि नियमित तपासणी केली जाणार आहे. रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांना आठवड्यातून किंवा महिन्यातून गृहभेट देण्यात येईल .यामुळे रुग्णालयात वारंवार जाण्याची गरज कमी होईल.

ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर सेवा मिळेल, कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन मिळेल, मोफत औषधे व ‘होम केअर किट’ देण्यात येणार आहे. तीव्र वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘मॉर्फिन’सारखी औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. तसेच घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘होम केअर किट’ पुरविण्यात येणार आहे.या किटमध्ये ड्रेसिंग साहित्य, आवश्यक औषधे, मूलभूत वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश असेल. यामुळे उपचार प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

रुग्णालयांमध्ये कशी असेल राखीव सुविधा?

  • घरपोच सेवेबरोबरच, रुग्णालयीन व्यवस्थाही सक्षम करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात ४ ते ६ खाटा, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालयात किमान २ खाटा
  • ‘पॅलिएटिव्ह केअर’ रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच आठवड्यातून एकदा स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग चालवला जाणार आहे. यामुळे गंभीर रुग्णांना प्राधान्याने उपचार उपलब्ध होतील.

कोणत्या रुग्णांना लाभ?

या कार्यक्रमांतर्गत दुर्धर व दीर्घकालीन आजारांचा समावेश आहे. यामध्ये कर्करोग, अर्धांगवायू, पार्किन्सन, मूत्रपिंड, यकृत निकामी होणे. दीर्घकालीन श्वसनविकार, वृद्धापकाळातील अशक्तपणा यामुळे दीर्घकालीन आणि वेदनादायक आजारांनी ग्रस्त रुग्णांना सातत्यपूर्ण आधार मिळणार आहे.

समुपदेशन, प्रशिक्षण आणि हेल्पलाईन काय?

रुग्णांइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचे कुटुंब. त्यामुळे काळजीवाहूंना रुग्णसेवेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मानसिक आधारासाठी समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध राहील. तसेच मदतीसाठी १०८ / १०२ रुग्णवाहिका सेवा यांसह ‘साथ-साथ’ – १८००-२०२-७७७७, ‘टेलीमानस’ – १८००-८९-१४४१६हे टोल-फ्री क्रमांक उपलब्ध असतील.

ठाणे जिल्ह्यात हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. तांत्रिक अंमलबजावणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.