ठाणे : ठाणे येथील राबोडी भागातील सरस्वती या शाळा प्रशासनाने केलेली फी वाढ अन्यायकारक असल्याचे सांगत पालकांनी शनिवारी भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या. पगार ज्या पटीने वाढत नाही, त्याहून अधिक शाळेची फि वाढत असल्याच्या व्यथा पालकांनी यावेळी मांडल्या. दरम्यान, पालकांची बाजूने न्याय देण्यासाठी शाळा प्रशासनासह शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असून पालकांच्या मदतीसाठी जे जे करावे लागेल, ते सर्व करू असे आश्वासन त्यांनी पालकांना दिले.
ठाणे येथील राबोडी भागात इंग्रजी माध्यमाची सरस्वती शाळा आहे. या शाळेने येत्या शैक्षणिक वर्षासाठी फि वाढ केली आहे. ई-ग्रंथालय (डिजीटल लायब्ररी), डिजीटल फलक, लिफ्ट अशा सुविधा सुरू केल्या असून यामुळे ही फि वाढ करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाकडून पालकांना सांगण्यात आले. परंतु शाळेने १५ ते २० टक्के फि वाढ केलेली असून ही अन्यायकारक असल्यामुळे पालकांनी शनिवारी शाळा प्रशासनाची भेट घेतली. परंतु शाळा प्रशासनाने फि वाढीची रक्कम भरलेली नसल्यामुळे त्यावरील व्याज, दंड माफ करण्याबरोबरच फि भरण्यास तीन महिन्यांची मुदत वाढवून देऊ असे सांगत शाळा प्रशासनाने वाढ करण्यात आलेली फि ची रक्कम कमी करण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दिली. शाळेकडून अन्यायकारक पद्धतीने फि वाढ करण्यात आल्याचे मुद्दा पालकांनी मांडला. यानंतर पालकांची बाजूने न्याय देण्यासाठी शाळा प्रशासनासह शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असून पालकांच्या मदतीसाठी जे जे करावे लागेल, ते सर्व करू असे आश्वासन आमदार केळकर यांनी पालकांना दिले.
पगार वाढीपेक्षा शाळेची फि अधिक वाढते
ठाणे येथील राबोडी भागातील सरस्वती शाळेने सीबीएसई च्या नावाखाली फि वाढ केली असून १५ ते २० टक्के फि वाढ करण्यात आलेली आहे. गेल्यावर्षी पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५ हजार इतकी वार्षिक फि होती. यंदाच्या वर्षी त्यात वाढ करून ती ६५ हजार इतकी करण्यात आली आहे. फि वाढ अन्यायकारक असून अशी फि वाढ होत राहीली तर, पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत शिक्षण देणे शक्य होणार नाही. वर्षाला पगार जेवढा वाढत नाही, तेवढी शाळेची फि वाढत आहे, अशा प्रतिक्रिया पालकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. तर, ई-ग्रंथालय (डिजीटल लायब्ररी), डिजीटल फलक, लिफ्ट अशा सुविधा सुरू केल्या असून यामुळे ही फि वाढ करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाकडून पालकांना सांगण्यात आले. मात्र, हा शाळा व्यवस्थापनाचा विषय आहे, असे पालकांनी सांगितले.
केळकर काय म्हणाले गेल्या चार दिवसांतील ही दुसरी शाळा आहे. यापुर्वी घोडबंदरमधील पालक माझ्याकडे आले होते. आता राबोडीतील सरस्वती शाळेच्या पालकांनी माझी भेट घेतली. पालकांनी मांडलेले त्यांचे म्हणणे न्याय आहे. सीबीएसई शाळांच्या नावाखाली फि वाढ करणे, प्रत्येक वेळी हजारो रुपये प्रवेश शुल्क वसुल करणे, हे सर्व अन्यायकारक आहे. शाळा प्रशासनासह शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असून पालकांच्या मदतीसाठी जे जे करावे लागेल, ते सर्व करू असे आश्वासन आमदार केळकर यांनी पालकांना दिले. शाळांनी फि वाढ करावी पण, ती अव्वाच्या सव्वा नसावी तसेच गणवेशासह शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती नसावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
