कल्याण : कल्याणकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने धिम्या मार्गावरून जात असलेल्या लोकलमधील एका प्रवाशाचा हातामधील मोबाईल दरवाजात उभा असताना, अचानक हातामधून रेल्वे मार्गात पडला. मुंब्रा खाडी मार्गाजवळील रेल्वे बोगद्याजवळ सोमवारी ही घटना घडली. मोबाईल रेल्वे मार्गात पडल्याने आणि लोकल धावती असल्याने प्रवासी काही करू शकत नव्हता.
मोबाईल रेल्वे मार्गात पडल्याने आणि तो रेल्वे मार्गाजवळून जात असलेल्या कोणा पादचाऱ्याने नेला या विचाराने कल्याणमधील रहिवासी असलेला रामप्रकाश त्रिपाठी हा प्रवासी अस्वस्थ झाला. त्यांनी कळवा रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा माघारी मुंब्रा रेल्वे स्थानकात येण्याचा निर्णय घेतला. मुंब्रा रेल्वे स्थानकात आल्यानंतर आपण एकट्याने रेल्वे मार्गातून जाऊन मोबाईल ताब्यात घेण्यापेक्षा आपण हा प्रकार मुंंब्रा रेल्वे पोलिसांना सांगू असा विचार प्रवासी रामप्रकाश यांंनी केला.
मुंब्रा ते कळवा दरम्यानचा नवा रेल्वे मार्ग खाडी किनारी आणि पूल मार्गावर आहे. त्यामुळे कोणीही पादचारी या रेल्वे मार्गांच्या बाजुने पायी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. रामप्रकाश त्रिपाठी यांनी मुंब्रा लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला. पोलिसांसमोर अशा अवघड जागी असलेल्या मुंब्रा रेल्वे बोगद्याजवळ जाण्याचे आव्हान होते. पण, रेल्वे पोलीस नलावडे, पवार, बेनके या पोलिसांनी रामप्रकाश यांना सोबत घेऊन मुंब्रा रेल्वे स्थानक ते मुंब्रा रेल्वे बोगदा असा रेल्वे मार्गालगत जीव मुठीत घेऊन प्रवास केला. अर्धा तासानंतर लोहमार्ग पोलीस आणि त्रिपाठी मुंब्रा रेल्वे बोगद्याजवळ पोहचले. त्यावेळी त्यांना त्रिपाठी यांचा रेल्वे मार्गाच्या बाजुला दगडांच्या कोपच्यात पडलेला मोबाईल आढळला. मोबाईल चालू स्थितीत होता. मोबाईल पाच ते सहा फुटावरून पडला होता. त्यामुळे त्याच्या वरील आवरणाला चिर पडली होती.
संबंधित मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलीस पुन्हा जीवमुठीत घेऊन मुंब्रा लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहचले. पंचनाम करून घेतल्यावर पोलिसांनी त्रिपाठी यांना त्यांचा मोबाईल त्यांना परत केला. लोकलमधून पडलेला मोबाईल मिळण्याची शक्यता नसताना तो लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाला म्हणून समाधान व्यक्त करत त्रिपाठी यांनी पुन्हा आपल्या मुंबईचा कार्यालयीन दिशेने प्रवास सुरू केला. वरून पडूनही मोबाईल चांगल्या स्थितीत होता. त्याच्यावर त्रिपाठी यांच्या सहकाऱ्यांचे फोन येऊन गेले होते. रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचे मोबाईल हातमधून रेल्वे मार्गात पडतात. आजुबाजुला नागरी वस्ती असली की मग असे मोबाईल स्थानिक रहिवास घेऊन जातात. मुंब्रा रेल्वे बोगदा भागात नागरी वस्ती नाही आणि वर्दळ नसल्याने हा मोबाईल सापडला असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
