Ghodbunder Road Update: घोडबंदर येथील पातलीपाडा भागात टेम्पोच्या धडकेत हरीप्रसाद मिश्रा (६४) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी हरीप्रसाद यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

घोडबंदर येथील आझादनगर भागात हरीप्रसाद हे त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसह वास्तव्यास होते. सोमवारी दुपारी ४ वाजता हरीप्रसाद हे पातलीपाडा भागात दूध आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी भरधाव टेम्पो चालकाने त्यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर टेम्पो चालक घोडबंदरच्या दिशेने निघून गेला.

घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी त्यांच्या मुलाला मोबाईलद्वारे संपर्क साधून दिल्यानंतर तो घटनास्थळी पोहचला. हरीप्रसाद यांनी अपघाताची माहिती मुलाला दिली. त्यानंतर मुलाने त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.