ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील काही ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल इंधन भरण्यासाठी रांगा दिसत असल्या तरी ठाणे जिल्ह्यात मात्र पेट्रोल आणि डिझेलची सध्यातरी आवक पुरेशी असल्याची बाब जिल्हा नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात डिझेल विक्री अधिक होत असून भिवंडीत डिझेल सर्वाधिक विक्री झाली. तर ठाणे, डोंबिवली, कल्याण यांसारख्या शहरात पेट्रोलची विक्री अधिक आहे. भिवंडीत मालवाहू वाहनांची वाहतूक अधिक असल्याने येथे डिझेल विक्री जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नागरिक इंधन दरवाढ किंवा तुटवड्याच्या भितीने पेट्रोल जास्त भरत असल्याचे पेट्रोल पंप मालकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ९ लाख २५ हजार७१५ किलोलीटर पेट्रोल तर ११ लाख ६१ हजार ८३३ किलोलीटर डिझेलचा साठा शिल्लक असल्याचे २८ मे या दिवशीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ही नोंद दिवसेंदिवस बदलत असते. परंतु जिल्ह्यात साठा सुरळीत असल्याचे दिसते.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर क्षेत्रात एकूण १०२ पेट्रोल-डिझेल पंप आहेत. यापैकी ठाणे महापालिका क्षेत्रात १७, भिवंडी २३, कल्याण ६, डोंबिवली ९, उल्हासनगर ८, नवी मुंबई (वाशी) २४, भाईंदर ७, अंबरनाथ ४, बदलापूर ४ पंपचा सामावेश आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही ग्रामीण क्षेत्रात पेट्रोल पंपवर इंधन भरण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत होते. शेतकरी तसेच इतर नागरिकांना वाहनांसाठी डिझेल वेळेत उपलब्ध होत नसल्याने हाल सहन करावे लागले. राज्यातील काही भागात इंधन तुटवडा भासत असला तरी ठाणे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसासाठा उपलब्ध असल्याची बाब नागरी पुरवठा विभागाच्या मिळालेल्या नोंदीत स्पष्ट झाले.

भिवंडी विभागात सर्वाधिक इंधनसाठा असल्याचे उघड झाले. येथे पेट्रोल २ लाख ४६ हजार किलोलीटर तर डिझेल ३ लाख ९७ हजार किलोलीटर साठा उपलब्ध आहे. वाशी विभागातही डिझेलचा २ लाख ६५ हजार ११२ किलोलीटर आणि पेट्रोलचा १ लाख ६६ हजार ३७२ किलोलीटर साठा शिल्लक आहे. ठाणे, डोंबिवली, मुंब्रा परिसरात मोठ्याप्रमाणात इंधन साठा शिल्लक आहे.

भिवंडी आणि मुंब्रा विभागात डिझेलची सर्वाधिक विक्री होते. २८ मे या दिवशी मिळालेल्या नोंदी नुसार, या दिवसभरात भिवंडीत ३ लाख ४३ हजार १८६ किलोलीटर तर मुंब्रा विभागात २ लाख ५ हजार ६५३ किलोलीटर डिझेल विक्री झाली. तसेच ठाणे विभागात पेट्रोलची ९३ हजार ११६ किलोलीटर विक्री झाली. कल्याणमध्ये पेट्रोलचा १ लाख ५ हजार ७७३ किलोलीटर खप नोंदविण्यात आला.

मुंब्रा, नवी मुंबई (वाशी) आणि भिवंडी क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गोदामे असून येथून अवजड वाहनांची वाहतूक अधिक होते. त्यामुळे या भागात डिझेलचा खप अधिक असल्याचे दिसते. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली भागात दुचाकी किंवा हलक्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागात पेट्रोलची मागणी दिसते.

ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत पेट्रोल आणि डिझेल इंधनाचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. – भास्कर तायडे, उप नियंत्रक, शिधावाटप विभाग.