ठाणे : येथील पोखरण रोड क्रमांक दोन भागात गुरुवारी एका गृहसंकुलाजवळ बिबट्या दिसल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात दोन सुरक्षा रक्षकांना बिबट्या दिसला. संबंधित भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला. परंतु त्यांना बिबट्या आढळून आला नाही.

पोखरण रोड क्रमांक दोन येथील बेथनी रुग्णालया मागील गृहसंकुलाजवळ गुरुवारी बिबट्या आढळल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. तसेच त्याचे चित्रीकरण देखील एका महिलेने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले होते. त्यानंतर वन विभागाने या परिसरात सापळा आणि कॅमेरे बसविले होते.

शुक्रवारी पहाटे या परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा दोन सुरक्षा रक्षकांनी केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षेसाठी वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेत होते. परंतु पथकाला बिबट्या आढळून आले नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रात्री वन विभागाचे कर्मचारी परिसरात तैनात होते.