काही कारणास्तव तिने पतीपासून फारकत घेत दुसरा विवाह केला पण, पहिल्या पतीपासून असलेल्या तिच्या पाच वर्षीय मुलीला दुसरा पती स्वीकारण्यास तयार नव्हता. त्यामुळे तिने ओळखीच्या महिलेला मुलगी दत्तक दिली. पण या चिमुरडीच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणाऱ्या महिलेनेच तिच्या विक्रीचा बेत आखला. मात्र, पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी अवघ्या सहा तासांत सापळा लावून मुलीची सुटका केली..

सुमारे २० दिवसांपूर्वीचा प्रसंग. ठाणे पोलीस परेड मैदानाच्या परिसरात ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि त्यांचे पथक दैनंदिन कामकाजात व्यस्त होते. दुपारी तीन वाजता अचानकपणे दौंडकर यांचा मोबाइल खणखणला. एका खबऱ्याने त्यांना फोन केला होता. एक महिला पाच वर्षांच्या मुलीची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती त्याने दिली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दौंडकर यांनी त्या महिलेची माहिती आणि तिचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके आणि मुकुंद हातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र दौंेडकर यांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे तिला पकडण्यासाठी सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे त्यांच्या पथकाने बोगस ग्राहक बनून तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि तिच्याकडून त्या पाच वर्षीय मुलीच्या विक्रीबाबत माहिती घेतली. या संभाषणादरम्यान तीस हजार रुपयांमध्ये त्या मुलीची विक्री करणार असल्याचे समोर आले. मात्र, या महिलेला पोलीस असल्याचा संशय येऊ नये म्हणून पथकाने तिच्यासोबत विक्रीचा सौदा करण्यास सुरुवात केली. विक्रीची रक्कम पोलिसांनी कमी करण्यास सुरुवात केली. अखेर तडजोडीअंती वीस हजार रुपयांवर तिने सौदा पक्का केला. या व्यवहारासाठी तिने त्याच दिवशी पथकाला भिवंडीतील रांजनोली भागात सायंकाळी सहा वाजता बोलाविले. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. ऐन वेळेस त्या महिलेने ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आणि पथकाला भिवंडीतील देवजीनगर भागात रात्री ८.३० वाजता बोलावून घेतले. दोन तासांचा अवधी असल्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन सापळा लावला. ठरल्याप्रमाणे ती महिला मुलीला घेऊन त्या ठिकाणी आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिच्या तावडीतून त्या मुलीची सुटका केली.

शोभा बन्सी गायकवाड (५०) नावाची ही आरोपी महिला कल्याणच्या कोळसेवाडी येथे राहणारी. ती काही वर्षांपूर्वी चेंबूर येथे राहत होती. तिच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. चेंबूर परिसरात राहत असताना त्या पाच वर्षीय पीडित मुलीच्या आईसोबत तिची ओळख होती. काही कारणांवरून पीडित मुलीच्या आईने तिच्या पतीपासून फारकत घेतली आणि काही महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला. पहिल्या पतीपासून असलेल्या तिच्या मुलीला दुसरा पती स्वीकारण्यास तयार नव्हता. त्यामुळे तिने शोभाला मुलगी दत्तक दिली. त्यानंतर ती दुसऱ्या पतीसोबत गुजरातमध्ये स्थायिक झाली. मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणाऱ्या शोभा हिने पैशांच्या हव्यासापोटी त्या मुलीच्या विक्रीचा बेत आखला. त्यासाठी ग्राहकांचाही शोध सुरू केला. पण, त्याचा सुगावा पोलिसांना लागला आणि विक्रीपूर्वीच पोलिसांनी त्या मुलीची सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी शोभाला अटक केली तर तिच्या आईचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच पीडित मुलीला उल्हासनगरच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.