कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरे करा तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नका, अशा सूचना देत ‘तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू’, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दहीहंडी उत्सव मंडळाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना केले.
उत्सवांकरिता मंडप तसेच ध्वनिक्षेपक आदींच्या परवानगीसाठी महापालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस आदी ठिकाणी खेटे घालावे लागत असल्याने अशा परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणी मंडळांकडून यावेळी करण्यात आली. दरम्यान, ही योजना राबविण्याचा निर्णय पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत सायंकाळी उशिरा घेण्यात आला.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील रस्ते अडवून भलेमोठे व्यासपीठ उभारण्यात येते. तसेच डीजेच्या दणदणाटाने ध्वनिप्रदूषण करण्यात येते. या संदर्भात उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान धार्मिक उत्सवांकरिता धोरण ठरविण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार, ठाणे, कल्याण तसेच अन्य महापालिकांनी उत्सवांकरिता धोरण तयार केले आहे. या उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. या सर्वाचे दहीहंडी उत्सव मंडळांनी पालन करावे, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात बुधवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, अप्पर पोलीस आयुक्त, आयुक्त संजीव जयस्वाल, भिवंडी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर तसेच खासदार राजन विचारे, राजकीय पक्षांचे नेते आणि दहीहंडी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.