ठाणे : येथील वागळे इस्टेट परिसरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा आणि ८ लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट रस्ता क्रमांक २१ येथे दोनजण गुटख्याची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटला मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून वाहनासह गुटखा विक्रीसाठी आलेल्या आयुष छोटेलाल निगम (२२) आणि शिवम सिताराम निगम (२२) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला १ लाख ४१ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
हे दोघेही लोकमान्यनगर भागातील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने करीत आहेत.