ठाणे पोलीस दलातील उपायुक्त तसेच निरीक्षक दर्जाच्या १४४ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये दोन पोलीस उपायुक्त, ४५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक आणि ७४ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. या बदल्यांमध्ये सेवानिवृत्त आणि बदल्यांमुळे रिक्त झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर पाच पोलीस निरीक्षकांना बढती मिळाली असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कळवा, मुंब्रा तसेच नौपाडा या तिन्ही भागांसाठी असलेल्या ठाणे शहर परिमंडळाचा पदभार विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्याकडे देण्यात आला असून या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त पी. आर. बुधवंत यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे. या बदल्या पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण शाखा आणि अतिक्रमण पथक आदी विभागांमध्ये करण्यात आल्या आहेत. भिवंडी शहर, निजामपुरा या दोन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नुकतेच सेवानिवृत्त झाले तर वर्तकनगर, श्रीनगर, बदलापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर पाच निरीक्षकांना बदल्यांमध्ये बढती मिळाली असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
..
आठ नवे निरीक्षक
राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमुळे आठ नवे निरीक्षक ठाणे पोलीस दलात दाखल झाले असून त्यापाठोपाठ आणखी आठ निरीक्षक लवकरच ठाणे पोलीस दलात दाखल होणार आहेत. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्याकडे ठाणे शहर परिमंडळाची जबाबदारी देण्यात आली असून या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त पी. आर. बुधवंत यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त एम. के. भोसले यांची बदली झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकरिता पूर्णवेळ उपायुक्त नव्हते. त्यामुळे या पदावर बुधवंत यांची वर्णी लावण्यात आली आहे. ठाणे पोलीस दलात पोलीस उपायुक्त केशव पाटील यांची नियुक्ती झाली असून त्यांच्याकडे विशेष शाखेचा पदभार सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.
नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदावर एम. सी. कारकर यांची नियुक्ती झाली असून यापूर्वी ते कळवा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदावर के. जी. गावित, भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदावर आर. एच. सस्ते, निजामपुरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक एस. व्ही. जाधव आणि बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर दिलीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.