ठाणे – ठाणे पूर्व रेल्वे स्थानकजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने अटक केले असून त्याच्याकडून सुमारे ३१ लाख ७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहंमद आफताब आलम मोहंमद सलीम अखतर(३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बिहार येथील छपरा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहंमद आफताब आलम मोहंमद सलीम अखतर हा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट ५ चे सहाय्यक पोलिस निरिक्षक भुषण शिंदे आणि पोलीस अमंलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहंमद याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ३० लाख ९६ हजार रुपये किमतीचा ३ किलो ९६ ग्रॅम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ आणि ११ हजार ५०० रुपयांचा मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ३१ लाख ७ हजार ५००रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक-५चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील हे करीत आहेत.