ठाणे: भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरामध्ये प्रवेश करण्यास पोलीस अधिकाऱ्यालाच मज्जाव करण्यात आल्याचा विचित्र प्रकार ठाण्यातील कोलशेत भागात उघडकीस आला. घर मालकाने गृहसंकुलातील एक देखभाल दुरुस्तीचा खर्च भरला नसल्याचे कारण येथील व्यवस्थापकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी पुढे केले. मागील काही वर्षांपासून ठाणे शहरात उंच मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. परंतु येथील सुरक्षा रक्षक, व्यवस्थापकांना विचारल्याशिवाय साहित्य आणणे, बाहेर नेणे अशी लहान-सहान कामे देखील करता येत नाही.
त्यामुळे येथे सुरक्षा रक्षक, कर्मचारी मालक आहेत की सदनिका खरेदी करणारा व्यक्ती मालक आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोलशेत येथील एका मोठ्या गृहसंकुलामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यातील तक्रारदार हे पोलीस निरीक्षक असून ते मुंबई येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. तेथील भाडेकरार १५ मे पासून संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांनी कोलशेत येथील गृहसंकुलात भाडेतत्त्वावर सदनिका घेतली. २९ एप्रिलला ते घराचे साहित्य घेऊन गृहसंकुलात घेऊन जाणार होते. त्यासाठी त्यांनी तेथील सोसायटी परवानगी घेतली. तसेच, गृहसंकुलाच्या हेल्पडेस्कबाबतच्या इ-मेलवर याबाबतची माहिती पाठविली.
२९ एप्रिलला सकाळी टेम्पो आणि मजूर साहित्य घेऊन मजुर गृहसंकुलात शिरले असता, त्यांना रोखण्यात आले. मालकाने एक देखभाल दुरुस्तीचा खर्च भरला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने याबाबतची माहिती घर मालकाला दिल्यानंतर घर मालकाने तात्काळ ठरविक रक्कम भरली. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास मजुरांना प्रवेश देण्यात आला. काहीवेळाने पुन्हा त्यांना टेम्पो बाहेर काढण्यास सांगण्यात आला. याबाबत पोलीस अधिकाऱ्याने तेथील व्यवस्थापन विभागात विचारले असता, मालकाने देखभाल दुरुस्ती संदर्भातील एक खर्च भरला नसल्याचे त्यांना सांगितले. तसेच जोपर्यंत खर्च भरणार नाही. तोपर्यंत सदनिकेत साहित्य नेण्यास प्रवेश दिला जाणार नाही असेही त्यांना म्हटले गेले.
अखेर संतापलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याने याबाबतची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, येथील सुरक्षा रक्षक, व्यवस्थापक आणि मदत विभागाच्या कर्मचाऱ्यावंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
