ठाणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजीटल मार्केटिंग, सायबर सुरक्षा, गुंतवणूक संदर्भातील अभ्यासक्रम शिकण्यास इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांच्या विदाचा (डेटा) गैरवापर करुन कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीची हमी देऊन त्याने विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित माजी कर्मचाऱ्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई येथील अंधेरी भागात कंपनीचे मुख्य कार्यालय असून ठाण्यातील कॅडबरी जंक्शन भागात कंपनीचे प्रशिक्षण केंद्र आहे. एआय, डिजीटल मार्केटिंग, सायबर सुरक्षा, गुंतवणूक संदर्भातील अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्रात शिकविले जाते. विविध भागातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावे यासाठी कंपनीचे एक संकेतस्थळ असून त्या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यासाठी लिंक दिल्या आहेत. संबंधित कंपनीत शैक्षणिक सल्लागार पदावर एक व्यक्ती काम करत होता. त्याच्याकडे अभ्यासक्रमास इच्छूक असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा विदा होता.

मागील काही महिन्यांपासून त्या व्यक्तीने केंद्रावर येण्यास बंद केले होते. त्यानंतर त्याने यातील काही विद्यार्थ्यांना संपर्क साधून त्यांना अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. तसेच त्यांचे मार्गदर्शन करून त्यांना अभ्यासक्रम खरेदी करण्यास सांगायचा. विद्यार्थ्याने शु्ल्क भरल्यानंतर ते शुल्क कंपनीकडे जमा होत होते. परंतु ती व्यक्ती विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर संपर्क साधून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवून देतो असे सांगत होता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे शुल्क भरले होते.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडे विद्यार्थ्यांच्या नोकरीची हमी दिली पण नोकरी मिळत नाही अशा तक्रारी येऊ लागल्या. परंतु कंपनीने अशी कोणतीही हमी दिली नव्हती. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता, हा प्रकार त्यांच्या माजी कर्मचाऱ्याने केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांची ४८ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.