ठाणे : ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरापर्यंतच्या ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत यंदा २५४ सार्वजनिक दहीहंडींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक १०४ दहीहंडी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरात होणार आहेत. दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून गस्तही वाढविण्यात येणार आहे.
ठाणे शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येतात. त्यामुळे ठाण्यातील दहीहंडी उत्सवाचे आकर्षण गोविंदा पथकांमध्ये मोठे आहे. ठाणे तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, पुणे यांसह विविध जिल्ह्यांमधून गोविंदा पथके ठाणे जिल्ह्यातील विविध दहीहंडी उत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. उंच थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस पाहायला मिळते.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या शहरांचा समावेश होतो. या संपूर्ण क्षेत्रात यंदा २५४ सार्वजनिक दहीहंडींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ठाणे आणि कळवा शहरात १०४ दहीहंडी होणार आहेत. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीची ठिकाणे, प्रमुख चौक आणि दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून गस्त आणि देखरेख वाढविण्यात येणार आहे. चोरी किंवा इतर गुन्हे घडू नयेत यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी देखील ठिकठिकाणी तैनात केले जाणार आहेत.
परिमंडळ – सार्वजनिक दहीहंडीचे आयोजन
परिमंडळ – एक – (जुने ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा क्षेत्र) – ५६
परिमंडळ -दोन – (भिवंडी) – ४३ परिमंडळ – तीन- (डोंबिवली, कल्याण) – ५६
परिमंडळ – चार – (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर) – ५१
परिमंडळ -पाच – (ठाणे शहरातील वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर, बाळकूम क्षेत्र) – ४८
एकूण – २५४.
ठाणे शहरात टेंभीनाका मित्र मंडळाकडून टेंभीनाका परिसर, आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळीनाका, संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने रहेजा पार्क, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने वर्तकनगर आणि मनसेच्या वतीने नौपाडा येथे दहीहंडीचे मोठे आयोजन होते. यात अनेक कलाकार सहभागी होत असतात.
