ठाणे : ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापू आणि भिवंडी क्षेत्रात म्हणजेच, ठाणे आयुक्तालय क्षेत्रात पोलीस मित्र होऊन पोलिसांना मदत करण्याची इच्छा आहे, तर ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा ‘पोलीस मित्र’ होण्याची संधी दिली आहे. या माध्यमातून कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलिसांची मदत करणे, वाहतुक कोंडी सोडविणे, पोलिसांसोबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशी कामे पोलीस मित्र बूनन करता येऊ शकतात.

पोलिसांशी दिलखुलास संवाद आणि सामाजिक सलोखा वाढविण्यात नागरिकांचीही मदत व्हावी, याकरीता ठाणे पोलिसांनी ‘पोलीस मित्र’ संकल्पना सुरु केली आहे. या उपक्रमाची वाढती निकड लक्षात घेता ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ईगल ब्रिगेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाला नवे बळ देण्यात आले आहे. ‘चला, ठाणे पोलिसांचे मित्र बनूया…’ या शीर्षकाखाली या मोहिमेला नव्याने सुरूवात करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजघडीला ८ हजार पोलिस मित्र आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे सर्वजण काम करीत असून कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत, वाहतुक कोंडीवर नियंत्रण, जनजागृती करणे आदी सामाजिक कार्य करीत आहेत. पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे स्वयंसेवक म्हणजेच पोलीस मित्र होय, यासाठी ‘पोलीस मित्र’ ॲप देखील तयार करण्यात आले असून पोलीस प्रशासनाशी सुसंवाद साधून, गुन्हेगारी रोखणे, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक नियंत्रणात पोलिसांना मदत करण्यासाठी ही संकल्पना राबवली जात आहे.

नेमका उद्देश काय ?

नागरिकांनी आपल्या मनातील पोलिसांसंदर्भातील भीती दूर करणे, सायबर क्राईम, महिला व ज्येष्ठ नागरिक सुरक्षा, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा, समाजात शांतता राखणे, वाहतूक नियमन, रस्ता सुरक्षा अभियान तसेच, एखाद्या गुन्ह्यांची माहिती किंवा संशयास्पद हालचालींची कल्पना पोलिसांना देणे आदी यामागचा उद्देश आहे.

पोलीस मित्र कसे व्हाल…

पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात विश्वास निर्माण करणे याच मुख्य हेतू “पोलीस मित्र” संकल्पनेचा आहे. या वर्षांत सुमारे १ लाख नागरिकांपर्यंत पोहचण्याचा उद्देश असून या लोकाभिमुख उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर (०९८१९४८७०६७) यांच्याशी संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.