ठाणे : ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि परिमंडळ पाचचे (वागळे) पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी रात्री पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले. यामध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनाही एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.

दरम्यान, ठाणे पोलीस दलातील मुख्यालय एकच्या पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची ठाणे ग्रामीण पोलीस दलात अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची अंबाजोगाई येथे अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, ठाणे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक जयंत बजबळे यांची ठाणे पोलीस दलात पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.