दिवाळीमध्ये फक्त टिकल्या आण लवंगी हेच फटाके वाजवावेत, असे सक्त आदेश ठाणे पोलिसांकडून देण्यात आले आहेत. याशिवाय, रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत फटाके वाजवण्यावर बंदीही घालण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या या आदेशामुळे आता आपटीबार, तडतड्या, सुतळी बॉम्ब हे मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्यावर बंदी असेल. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयानेही पालिकेला फटाक्यांच्या बेकायदेशीर दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या हद्दीतील रहिवासी भागात थाटण्यात आलेल्या विनापरवाना स्टॉल्सवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फटाक्यांमुळे होणारे अपघात ही गंभीर बाब आहे. फटाक्यांच्या स्टॉल्समुळे रहिवाशी किंवा गर्दीच्या भागात दुर्घटना घडल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे निवासी इमारतीतील गाळ्यांमध्ये फटाक्यांचा साठा ठेवणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर दिवाळीच्या आधी कठोर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व पालिका आणि पोलिसांना दिले आहेत. तसेच त्याबाबतचा अहवाल २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने पालिका-पोलिसांना दिले आहेत. नफ्यासाठी सुरक्षा धाब्यावर बसवू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याच वेळेस केरळच्या कोल्लममधील मंदिरामध्ये आतषबाजीसाठी ठेवण्यात आलेल्या फटाक्यांना आग लागून १०० भाविकांना जीव गमवावा लागल्याच्या आणि फेब्रुवारी महिन्यात गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या वेळेस लागलेल्या आगीच्या घटनेची या वेळेस न्यायालयाने विशेषकरून आठवण करून दिली. तसेच या सगळ्यांतून धडा घेण्याची गरज आहे, असेही म्हटले. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही फटाक्यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी विविध निर्बंध जारी केले आहेत. दरम्यान, आता या आदेशाचे पडसाद कशाप्रकारे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत उत्सव साजरे करताना घालून देण्यात आलेल्या मर्यादांच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि राजकीय पक्षांमध्ये अनेकदा संघर्ष झाला आहे.