ठाणे : एमडी या अमली पदार्थांच्या फॅक्टरीवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी १८ लाख ५४ हजार ५०७ रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच, नेपाळमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली.
ओम गुप्ता, भिम यादव आणि अमरकुमार कोहली अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. सुमारे महिन्याभरापूर्वी घोडबंदर भागात गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी विशाल सिंह आणि मल्लेश शेवला यांना अटक केली होती.
पोलिसांनी त्यांच्याकडून १०.९३ ग्रॅम वजनाचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी हे अमली पदार्थ उत्तराखंड येथून आणल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी दोन पथके तयार केली. यातील पहिल्या पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, शरद पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस शिपाई मिनीनाथ शिकारे यांनी उत्तराखंड येथे जाऊन तपास सुरु केला. उत्तराखंड येथील मेलतोडा भागात एमडी हे अमली पदार्थ बनविले जात असल्याचे उघड झाल्यानंतर पथकाने २७ जूनला या फॅक्टरीवर धाड टाकली. तसेच १८ लाख ५४ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला.
दरम्यान, ही फॅक्टरी चालविणारे तिघे उत्तराखंड येथील टनकपुर भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, हवालदार सुनिल निकम, पोलीस नाईक सचिन बंडगर, पोलीस नाईक ठाणेकर यांनी ओम गुप्ता, भिम यादव आणि अरकुमार कोहली या तिघांना अटक केली. ते नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते. अटकेत असलेल्या तिघांना ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजुर झाली आहे.