ठाणे : उशाशी खाकी वर्दीचे स्वप्न, डोळ्यात सरकारी नोकरीची आशा तर दुसरीकडेे डासांचा विळखा, अंधारी जागा आणि भीती हे चित्र आहे ठाणे शहर पोलीस दलातील भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे. ठाण्यातील साकेत येथील पोलीस मैदानाबाहेर भरती सुरू झाल्यापासून दररोज हे चित्र पाहायला मिळते. पोलीस शिपाई पदासाठी असलेल्या भरतीसाठी पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार दिसतात. 

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया पार पडत असून ठाणे शहर पोलीस दलातील ६५४ जागेसाठी उमेदवारांकडून पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या जागांसाठी ठाणे पोलीस दलाकडे २१ हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले. याची सरासरी केल्यास प्रत्येकी एका जागेसाठी किमान ३२ ते ३३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सांगली, नाशिक, धाराशीव, सातारा, नंदुरबार अशा विविध भागांतून उमेदवार ठाणे शहरात दाखल होत आहे. मैदानी चाचणी असल्याने उमेदवारांना चाचणीच्या एक दिवस आधीच पोहचावे लागते.

पर-जिल्ह्यातून रेल्वेने आलेले उमेदवार ठाणे रेल्वे स्थानक गाठल्यानंतर रिक्षाने एक दिवस आधी मैदान गाठतात. त्यानंतर मैदानात प्रवेश मिळतो का पाहतात. परंतु  सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारल्यानंतर उमेदवार पदपथावर प्लॅस्टिक किंवा फलकाचा भाग अंथरून उद्याच्या मैदानी चाचणीचा विचार करतात. त्यांना परंतु जस-जशी रात्र होते. तसा डासांचा प्रादुर्भाव वाढू लागतो. मैदानापासून काही अंतरावर खाडी, झुडपे तसेच नाला असल्याने डासांचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा रात्री रस्त्यावरील विद्युतपुरवठाही बंद असतो. अंगावर एखादी चादर मिळाली तर ठीक. नाहीतर तसेच झोपण्याची वेळ उमेदवारांवर येते. रात्री लघुशंका देखील त्याच परिसरात एखाद्या आडोशाला करण्याची वेळ उमेदवारांवर येते.

याबाबत एका उमेदवाराला  विचारले असता, सकाळी लवकर क्रमांक यावा आणि मैदानी चाचणी पूर्ण व्हावी यासाठी मैदानाबाहेर झोपलेले उत्तम असल्याचे त्याने सांगितले. हा उमेदवार जालना येथून आला होता. त्याने  विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. परंतु गावी जेमतेम १० ते १२ हजार रुपये वेतनाची नोकरी मिळत असल्याने सरकारी नोकरीच्या शोधात असल्याचे त्याने सांगितले.

धाराशीव येथून आलेला आणि औषधनिर्मिती शास्त्राचे (फार्मसी) शिक्षण घेतलेल्या उमेदवारानेही बेरोजगारी आणि वेतनाचे कारण देत पोलीस भरतीत उतरल्याचे सांगितले. या पदपथावर असे अनेक उमेदवार होते. ज्यांनी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले होते. पोलिसांनी कुठेतरी आम्हाला राहायची सोय केली आहे. परंतु तो पत्ता मैदानापासून लांब असल्याने पदपथावर झोपल्याचे तरुणाने सांगितले.

ठाणे पोलीस दलातील रिक्त जागांसाठी २१ हजारहून अधिक अर्ज आले आहेत. आम्ही उमेदवारांना राहण्यासाठी सिद्धी सभागृह येथे व्यवस्थादेखील केली आहे. काही उमेदवार सकाळी लवकर रांग लावून मैदानी चाचणी पूर्ण करता यावी म्हणून मैदानाबाहेरील पदपथावर थांबतात. – डॉ. पवन बनसोड, उपायुक्त, मुख्यालय-२, ठाणे पोलीस.