ठाणे : पोलीस भरतीत यशस्वी होऊन सरकारी नोकरी मिळेल. शेतकरी, कष्टकरी आई-वडिलांना आधार मिळेल असे स्वप्न उराशी बाळगलेल्या हजारो उमेदवारांचे स्वप्न धुळीस मिळत आहेत. तर काहीजण पात्र झाल्याने त्यांचा पोलीस भरतीचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याने चेहऱ्यावर हसू उमटत आहे. ठाणे पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात असून मैदानाबाहेर दररोज आनंद आणि दु:खाचे अश्रू उमेदवार आणि पालकांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. यातील अनेक उमेदवार हे पदवीधर, पदव्युत्तर, अभियंते झालेले आहेत. त्यामुळे यश-अपयशा पाठोपाठ बेरोजगारीचे गडद ढग देखील दाटलेले दिसतात.

ठाणे शहर पोलीस दलासाठी मागील काही दिवसांपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रात ६५४ जागांसाठी पोलीस शिपाई या पदासाठी भरती असून यामधील ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. अवघ्या ६५४ जागांसाठी संपूर्ण राज्यभरातील विविध भागातून २१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल ठाणे पोलिसांना ऑनलाईनरित्या प्राप्त झाले आहेत. शिपाई पदासाठी शैक्षणिक अर्हता फक्त १२ वी उत्तीर्ण आहेत. परंतु या पदासाठी अनेक पदवीधर, पदव्युत्तर इतकेच नव्हे तर अभियंत्यांनीही अर्ज दाखल केले. ऑनलाईन अर्जाची सरासरी केल्यास ६५४ पैकी प्रत्येकी एका जागेसाठी किमान ३२ जण स्पर्धेत आहेत. या सर्व उमेदवारांची सध्या मैदानी चाचणी ठाण्यातील साकेत भागातील पोलीस मैदानात होत आहे. परंतु कोणी उंचीमुळे, कोणी धावण्यात तर कोणी गोळाफेक करण्यात अपयशी ठरल्याने अनेकांना अपात्र व्हावे लागत आहे. तर काहीजणांच्या सरावाला यश मिळाल्याचे दिसते.

दुसरीकडे मैदानात उमेदवार गेल्यानंतर त्याचे पालक मैदानाबाहेर तासन्-तास पाल्य यशस्वी होईल या आशेने मैदानाकडे डोळे लावून बसलेले दिसतात. उमेदवार मैदानातून बाहेर पडल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आसू आणि हसू असते. अपात्र ठरलेले उमेदवार आपल्या कुटुंबाचे स्वप्न यावेळीही पूर्ण झाले नसल्याची खंत व्यक्त करत आता भविष्यात कसे होणार असा प्रश्न त्यांना पडलेला दिसतो. तर, शारिरीक चाचणीत पात्र झालेले उमेदवार लेखी चाचणीत यशस्वी होणार का, या विचारामध्ये असतात.

सांगली येथे राहणारी आणि पोलीस होण्याचे स्वप्न मागील नऊ महिन्यांपासून उराशी बाळगणारी एका तरुणीसोबत देखील असेच घडले. पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीमध्ये तिने ३५ हजार रुपये भरले होते. तिने सांगितले की प्रशिक्षण घेताना माझी उंची पात्र झाल्याचे दिसत होते. मी बाहेरून देखील उंची तपासली. पण मी पात्र दिसत होते. परंतु आता मैदानी चाचणीत उंची दोन इंचाने कमी दाखविल्याने अपात्र झाले. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. घरी आता काय उत्तर देणार असा प्रश्न तिला पडला होता.

विज्ञान शाखेत पदवी घेतलेल्या तरुणीने सांगितले की, तिने आता पर्यंत दोन वेळा भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. परंतु दोन्हीवेळा मैदानी चाचणीत अपयश आल्याने तिने आता पोलीस भरतीचे स्वप्न सोडून इतर व्यवसाय किंवा नोकरी पत्करणार असल्याचे सांगितले.

मागील तीन तासांपासून मी बहिणीची वाट पाहत आहे.अद्यापही मैदानातील चाचणी पूर्ण झाली नाही. पोलीस भरतीसाठी अनेक महिने सराव केले. त्यामुळे ती यशस्वी होईल असे एका उमेदवाराच्या भावाने सांगितले.