ठाणे येथील उपवन परिसरात दुचाकींवरून अतिसाहसी कसरती करणाऱ्या ‘बाइकर्स’चे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’तून प्रसिद्ध होताच शनिवारी दिवसभरात अशा ६८ दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीला कायमस्वरूपी पायबंद बसावा म्हणून साध्या वेशातील पोलिसांची गस्त आणि तक्रार क्रमांकाचे फलक लावण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे.
उपवन तलाव परिसरात रात्रीच्या वेळी काही तरुण दुचाकींवर कसरती करीत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी या रस्त्यांवर वेगवेडय़ांचा धिंगाणा सुरू असतो. तसेच दुचाकीच्या सायलेन्सर लावण्यात आलेले विशिष्ट फिल्टर आणि कर्णकर्कश हॉर्नचे आवाज करीत तरुणाईची हुल्लडबाजी सुरू असते. याशिवाय, या दुचाकीस्वारांच्या कसरतीमुळे परिसरात अपघातही होतात. या संदर्भात, ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम घेऊन शनिवारी ६८ दुचाकीस्वारांवर कारवाई केली.

दुचाकीस्वारांसाठी सापळा
स्टंटबाज दुचाकीस्वारांना पकडण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक करण्यात आली असून हे पथक परिसरात गस्त घालणार आहे. याशिवाय, कसरती करणाऱ्या दुचाकीस्वारांची माहिती देण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी केले.
जागरूक नागरिकांनी अशा बाइकस्वारांची तक्रार ठाणे पोलिसांच्या वाहतूक हेल्पलाइन ८२८६४००४०० किंवा ८२८६३००३०० या क्रमांकावर करावी किंवा dcptraffice@thanepolice.org  येथे त्यांची छायाचित्रे ई-मेल करावीत, असे आवाहन करंदीकर यांनी केले आहे.