ठाणे पोलिसांचा अभिनव उपक्रम

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या गृह अलगीकरणातील व्यक्तींना गृहसंस्थांमधील नागरिकांकडून त्रास होऊ नये तसेच त्याला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ठाणे पोलीस आता पुढे सरसावले आहे. ठाणे पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार कर्मचाऱ्यांचे पथक तयार केलेले असून हे कर्मचारी दररोज गृह अलगीकरणातील शेकडो जणांना त्यांच्या अडचणी तसेच माहिती विचारत आहेत. पोलिसांच्या आधाराने मानसिकरीत्या खचत असलेल्या गृह अलगीकरणातील व्यक्तींना मोठा दिलासा मिळत आहे.

करोना रुग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांचे त्यांची लक्षणे पाहून अलगीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनामार्फत

घेतला जातो. अनेकदा करोना आजारापेक्षा यासंबंधी आखण्यात आलेल्या प्रक्रियेचे ताण रुग्ण तसेच कुटुंबीयांवर येत असते. करोना रुग्ण रुग्णालयात आणि कुटुंबीय अलगीकरणात त्यामुळे अनेक जण मानसिकरीत्या खचत असतात. अनेकदा गृहसंकुलातील सदस्यही त्यांना त्रास देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गृह अलगीकरणाची परवानगी असतानाही वसाहतींमधील सदस्य करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचा हट्ट धरतात. त्यामुळे एक प्रकारे सामाजिक बहिष्काराचे दडपणही करोनाबाधितांवर येत असते.

पोलीस आयुक्तांचा पुढाकार

करोनाच्या संशयित रुग्ण तसेच गृह अलगीकरणात असलेल्या बाधितांना मिळत असलेली बहिष्काराची वागणूक टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता पुढाकार घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात एकूण ३५ पोलीस ठाणी आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे. दररोज हे पोलीस कर्मचारी करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांचा मोबाइल क्रमांक, त्यांचा संपूर्ण पत्ता यांची माहिती महापालिकेच्या डॉक्टरांकडून घेत आहेत. या माहितीचा तपशील मिळाल्यानंतर हे कर्मचारी संबंधित गृह अलगीकरणातील व्यक्तीशी मोबाइलवरून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात. तसेच गृहसंस्थांतील सदस्यांकडून कोणतीही अडवणूक किंवा त्रास होत नाही ना याचीही माहिती घेत असतात.

ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार पोलीस कर्मचारी अलगीकरणातील व्यक्तीशी संवाद साधतात. त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करोनाबाधित आणि गृह अलगीकरणातील व्यक्तींचा तपशील मिळतो. यामुळे अलगीकरणातील व्यक्तीवर लक्षही राहते आणि त्याला काही अडचणी येत असल्यास त्याही सोडविण्यास मदत होत आहे.

– बाळासाहेब पाटील,उपायुक्त, विशेष शाखा