ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांची ठाण्यातून इतर शहरांमध्ये झालेली बदली आठवडाभरातच रद्द झाल्याचा प्रकार ताजा असतानाच यापैकी काही अधिकाऱ्यांना शहर पोलीस दलात पुन्हा एकदा मोक्याच्या पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागात बदली झालेल्या पंजाबराव उगले यांची बदली रद्द करत त्यांना ठाणे पोलीस दलात थेट सह-आयुक्त पदावर बढती दिली गेल्यानंतर अमरसिंग जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पद सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाधव यांची नवी मुंबईत डायल ११२ मध्ये अधिक्षकपदी नियुक्ती झाली होती. ही बदली रद्द करत त्यांना ठाण्यात पुन्हा एकदा मोक्याच्या पदावर स्थापीत करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच बदल्या आणि नियुक्त्या झालेल्या अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना ठाणे पोलीस दलात पदभार मिळाला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेपदी पुन्हा एकदा अमरसिंह जाधव यांचीच नेमणूक झाली आहे. त्यांची बदली डायल ११२ मध्ये अधीक्षकपदी झाली होती. परंतु अचानक चक्रे फिरल्यानंतर त्यांची बदली रद्द झाली. मागील काही वर्षांपासून त्यांच्याकडे गुन्हे अन्वेषण शाखेचा पदभार आहे. ठाणे पोलीस दलात गुन्हे अन्वेषण विभाग मिळविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. एकनाथ शिंदे यांचे लाडके अधिकारी अशी ओळख असणारे आणि नुकतेच नाशीक येथून पुन्हा ठाण्यात बदलून आलेले पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, प्रशांत कदम यांच्या नावाची चर्चाही या पदासाठी होती. मुळचे वाई भागातील असलेले अमरसिंह जाधव यांची नवी मुंबई डायल ११२ येथे बदली झाली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातून थेट नवी मुंबई डायल ११२ मधील नियुक्ती ही जाधव यांची वेगळ्या अर्थाने पदनावती मानली जात होती.
सातारा जिल्ह्यातील मुळ असलेले जाधव हे शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. बदलीचा आदेश निघाल्यानंतर तीन दिवसात त्यांची नवी मुंबईतील नियुक्ती रद्द करत त्यांना पुन्हा ठाण्यात पाठविण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला होता. पंजाबराव उगले यांच्या पाठोपाठ जाधव यांचीही बदली रद्द झाल्याने ठाणे पोलीस दलात शिंदे म्हणतील तीच पुर्वदिशा असा कारभार पहायला मिळाला होता. दरम्यान बदली रद्द होऊन ठाण्यात परतलेले अमरसिंग यांच्याकडे पुन्हा गुन्हे अन्वेषण (क्राईम ब्रांच) विभागाच्या उपायुक्त पदाचा कार्यभार सोपविण्याचा निर्णय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घेतला आहे.
सर्वच नियुक्त्यांमध्ये शिंदे पॅटर्न ?
ठाणे पोलीस दलात बदलून अथवा त्याच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा नव्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. अपर पोलीस आयुक्त – पश्चिम विभागपदी अशोक दुधे यांची नियुक्ती झाली. तर अपर पोलीस आयुक्त प्रशासन या पदावर शिवाजी राठोड यांची नियुक्ती झाली. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्तपद अमरसिंह जाधव यांच्याकडेच असणार आहे. तर परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी बाळासाहेब पाटील यांची नेमणूक झाली. भिवंडी परिमंडळाच्या उपायुक्तपदी पवन बन्सोड यांची नियुक्ती झाली. तसेच, मुख्यालय एकच्या उपायुक्तपदी मीना मकवाना, मुख्यालय दोनच्या उपायुक्तपदी विवेक पानसरे यांची नियुक्ती झाली आहे.
