ठाणे : नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी काही महिन्यांपुर्वी ठाण्यात जनता दरबार भरवण्यास सुरूवात केली. त्यानंतर शिवसेनाकडून (शिंदे गट) ‘जन संवाद’ हा उपक्रम राबविला जात असतानाच, आता मात्र शिंदेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे उपनेते नितीन नांदगांवकर यांचा जनता दरबार भरवला जाणार असल्याचे दिसून येत आहे.
काही महिन्यापुर्वी शिंदेच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार भरवण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शीत युद्ध रंगल्याचे दिसून आले. गणेश नाईक यांच्या घोषणेनंतर भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही ‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमातून जनता दरबार भरविण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर ठाण्यातील भाजपच्या आमदारांनी सुरू केलेल्या ‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने (शिंदे गट) ‘जन संवाद’ उपक्रम हाती घेतला. ठाण्यात कायमच जनता दरबारामुळे सुरू असलेल्या चढाओढीत आता ठाकरेंचा सहभाग झाल्याचे चित्र आहे. शिंदेच्या बालेकिल्ल्यात गुरूवारी, १२ जूनला ठाकरें गटाचा जनता दरबार भरणार आहे. ठाण्यातील शिवसेना चंदनवाडी शाखेत गुरूवारी सकाळी ११ वाजता हा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन मधुकर नांदगावकर, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शिवसेना माजी खासदार राजन विचारे यांची उपस्थिती असणार आहे.
जनता दरबाराची चढाओढ
ठाण्यामध्ये जनता दरबारावरून सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार भरवण्यास सुरूवात केली. त्यानंतर, भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमानंतर शिंदे गटाकडूनही जनता संवाद उपक्रम हाती घेण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही जनता दरबार घेण्याचे सुतोवाच केले होते. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने जनता दरबाराच्या चढाओढीत सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.
जनता दरबारात होते काय ?
जनता दरबारात सर्वसामान्या नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. यात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्य:स्थितीतील वाद – कलह तसेच इतर समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो.