ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश असतानाही कोपरी येथे शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री १२ नंतर फटाके फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरात ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असतानाही हा प्रकार झाला आहे. गेल्याकाही वर्षांपासून ठाण्यात मध्यरात्री केव्हाही फटाके फोडले जातात. त्यामुळे वृद्ध, बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, याप्रकरणी अतिउत्साही कार्यकर्त्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोपरी येथे शिंदे गटाचे शाखाप्रमुख रोहीत पिंपळोलकर यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोपरी येथील सिद्धार्थ नगर परिसरातील कल्पेश मोरे (२७), सुशांत मोरे (२७), योगेश पांचाळ (४०) आणि मयुर नार्वेकर (३७) यांनी परिसरात २७ नोव्हेंबरला रात्री १२ नंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ही बाब आढळून आल्यानंतर त्यांनी हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीकाळ वादही झाला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात पोलिसांनी चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम २२३, २९२, २९३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

नागरिक हैराण…

गेल्याकाही वर्षांपासून ठाणे शहरात गल्लोगल्ली नव-नव्या पदाधिकारी, स्वयंघोषित कार्यकर्त्यांची भर पडू लागली आहे. आपल्या पुढाऱ्याचा वाढदिवस, सत्कार करण्यास हे कार्यकर्ते पुढाकार घेत आहे. परंतु रात्री-अपरात्री केव्हाही वाढदिवस, सत्कार समारंभ साजरे होत आहे. एकेकाळी सुसंस्कृत ठाण्यात ही वेगळीच प्रथा पडू लागली आहे. वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी गोंगाट केला जातो. त्यात भरीस भर म्हणून फटाक्यांची आतषबाजी केली जाते. या गोंगाटामुळे नागरिकांची झोप मोड होत आहे. याबाबत काही नागरिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये तक्रारी नोंदवितात. मात्र, नियंत्रण कक्षाकडून तक्रारीची माहिती मिळताच स्थानिक पोलिस वाढदिवस साजरा होत असलेल्या ठिकाणी पोहचतात. तोपर्यंत वाढदिवस साजरा करून ही टोळकी तेथून निघून गेलेली असतात. गेल्या काही महिन्यांपासून असे प्रकार वाढीस लागल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. वृद्ध नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.