ठाणे: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी प्रदिप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे गेले महिनाभर वादात सापडलेल्या ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या समर्थनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अखेर बुधवारपासून सक्रिय झालेले दिसले. ठाणे महापालिकेत चितळसर-मानपाडा भागातून सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मिनाक्षी शिंदे २०१७ मध्ये महापौर पदी विराजमान झाल्या. त्यापुर्वी आरोग्य समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले होते. एकनाथ शिंदे यांच्या कडव्या समर्थकांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या मिनाक्षी यांचे नाव लोकसभेच्या उमेदवारीसाठीही चर्चेत होते. अतिशय आक्रमक स्वभाव, विरोधकांना जहाल भाषेत भिडण्याची वृत्ती यामुळे शिंदे यांच्या संघटनेत पहिल्या फळीत सक्रीय राहीलेल्या मिनाक्षी यांना लक्ष्य करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच कोंडीत पकडण्याची रणनिती आखल्याचे चित्र यानिमीत्ताने पुढे आले आहे.
चितळसर-मानपाडा हा शिवसेनेचा सुरुवातीपासूनच बालेकिल्ला. मिनाक्षी यांचे पती राजेंद्र हे शिवसेनेचे पुर्वीपासून सक्रीय कार्यकर्ते. या भागात एकेकाळी काॅग्रेसचे दिवंगत नेते बाळाकृष्ण पुर्णेकर यांचा मोठा प्रभाव राहीला. आगरी समाजातील पुर्णेकर कुटुंबाला आव्हान देत राजेंद्र आणि मिनाक्षी या शिंदे दाम्पत्यांनी चितळसर-मानपाडा भागात शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा हातभार लावला. आनंद दिघे यांच्या निधनानंतर काही वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचे जिल्हाप्रमुख पद आले. पुढे शिंदे आमदार म्हणूनही निवडून आले. शिंदे यांच्या या राजकीय प्रवासात राजेंद्र आणि मिनाक्षी शिंदे यांची त्यांना अगदी सुरुवातीपासून साथ लाभली. चितळसर-मानपाडा भागातील चाळ, झोपडपट्टी वस्त्यांमधून निवडून येणाऱ्या मिनाक्षी यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील महत्वाची पदे सोपवली. त्यांना आरोग्य, महिला बालकल्याण समितीचे सभापती पदही देण्यात आले. त्यांची ही कारकिर्द प्रभावी राहीली.
२०१७ मध्ये ठाण्याचे महापौर पद महिलांसाठी राखीव झाले. याच काळात खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नीचे नाव या पदासाठी अग्रभागी होते. शिवसेनेतल्या अन्य काही ज्येष्ठ नगरसेविकांची नावेही या पदासाठी घेतले जात होते. एकनाथ शिंदे यांनी मात्र महापौर पदासाठी मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचा आग्रह त्यावेळी ‘मातोश्री’वर धरला. खासदार, आमदारांच्या घरात हे पद दिले तर सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरेल हे मातोश्रीला पटवून देण्यात शिंदे यशस्वी ठरले. पक्षाच्या एका मोठया गटाचा विरोध असूनही या काळात मिनाक्षी महापौर पदी विराजमान झाल्या. शिंदे यांच्या गटातील महापौर म्हणून त्या ओळखल्या गेल्या.
लोकसभेसाठी चर्चेत, महापालिका निवडणुकीत बंडाचा इशारा
ठाणे लोकसभेची जागा भाजपकडून हट्टाने मागून घेतल्यानंतर शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारीसाठी मिनाक्षी यांचे नावही चर्चेत घेण्यात आले होते. आमदार प्रताप सरनाईक, विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठोपाठ माजी महापौर म्हणून मिनाक्षी यांना संधी दिली जावी असा पक्षात मतप्रवास होता. शिवाय महिला उमेदवाराचा प्रयोग पक्षाच्या पथ्यावर पडेल असाही सुर होता. मात्र या स्पर्धेत नरेश म्हस्के सरस ठरले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत मानपाडा-चितळसर पॅनलमध्ये आपल्या मर्जीचा उमेदवार मिळावा यासाठी मिनाक्षी यांनी थेट बंडाचा इशारा दिला होता. लगतच असलेल्या देवराम आणि संजय भोईर या स्वपक्षातील नेत्यांचा त्यांना टोकाला विरोध होता. या विरोधातून मिनाक्षी यांच्या समर्थकाचे तिकीट कापले जाईल अशीही चर्चा होती. मात्र बंडाच्या आवाजानंतरही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पारड्यात आपले मत टाकले. या पॅनलमधील चारही जागा मिनाक्षी यांना मिळाल्या आणि त्यांनी त्या जिंकल्याही. तत्पुर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडात त्या अग्रभागी राहील्या. त्यामुळे त्यांना महिला जिल्हाप्रमुख पद मिळाले. शिंदे यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये त्यांचा असलेला समावेश आणि त्यातूनच त्यांचा वाढत जाणारा राजकीय प्रभाव पक्षात अनेकांसाठी नाराजीचे कारण ठरले आहे.
मिनााक्षी यांच्या बचावासाठी शिंदेसेना आग्रही ?
प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे कुटुंबिय राजेंद्र आणि मिनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत. फिर्यादींच्या पुरवणी जबाबात मिनाक्षी यांचे नाव होते. तरीही गेले २५ दिवस मिनाक्षी यांची चौकशी झाली नव्हती. अखेर गेल्या आठवड्यात त्यांची चौकशी सुरु झाली. तेव्हाही शिंदे सेनेचे नेते चिडीचूप होते. मात्र चौकशीनंतर मिनाक्षी यांच्यावर अटकेची कारवाई करावी यासाठी पुर्णेकर कुटुंबिय आणि ठाकरे गटाचे नेते आक्रमक होताच शिंदे सेना त्यांच्या समर्थनासाठी उघडपणे रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्याविषयी शेलक्या शब्दात करण्यात आलेली टिका हे निमीत्त ठरले असले तरी मिनाक्षी यांचे समर्थन हा या रणनितीचा उघड भाग असल्याची आता चर्चा आहे. मिनाक्षी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली तर ठाण्यात ठाकरे गटाचे मनोधैय वाढेल आणि राजकीयदृष्टया हे फार परवडणारे नाही याची पुर्ण जाणीव शिंदे गटातील नेत्यांना आहे. त्यातूनच मिनाक्षी यांचे उघड समर्थन करण्यापर्यत आता शिंदेसेनेचे नेते सरसावले आहेत. तुर्तास मिनाक्षी यांची पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असला तरी पोलीस तपासापाची दिशा नेमकी काय असेल याविषयी मात्र अजूनही संभ्रमच आहे.
